कोलकाता : बीसीसीआयची ९० वी वार्षिक आमसभा शनिवारी येथे आयोजित करण्यात येत आहे. कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकोपामुळे भारतीय संघाला आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पाठवायचे की नाही, याचा निर्णय या बैठकीत होणार आहे. २४ सूत्री कार्यक्रम पत्रिकेत दौरा वेळापत्रकात बदलाचा देखील समावेश आहे. हा विषाणू द. आफ्रिकेतून पसरला असल्याने चिंता वाढली आहे.
टीम इंडियाला ९ डिसेंबर रोजी द. आफ्रिकेकडे चार्टर्ड विमानाने रवाना व्हायचे आहे, मात्र हा दौरा होईल की नाही, हेच अद्याप ठरलेले नाही. भारतीय संघाला सात आठवड्यांच्या या दौऱ्यात तीन कसोटी, तीन वन-डे आणि चार टी-२० सामने खेळायचे आहेत. ही मालिका बैठकीच्या अधिकृत अजेंड्यात नसली तरी भावी वेळापत्रकाच्या वेळी यावर चर्चा शक्य आहे.
इंग्लंड दौऱ्यात सप्टेंबरमध्ये भारतीय संघ मालिकेत २-१ ने पुढे होता, पण बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव होताच अखेरची कसोटी खेळविण्यात आली नव्हती. हा सामना आता जुलै २०२२ ला होईल. सध्या भारत अ संघ द. आफ्रिकेतच असून, संघाला परत बोलविण्यात आलेले नाही. शंभरावा कसोटी सामना खेळण्याच्या उंबरठ्यावर असलेला कर्णधार कोहली याने यावर स्पष्टीकरण मागितले आहे.
संघ व्यवस्थापन बोर्डाच्या संपर्कात असून पुढील काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे कोहलीने काल म्हटले होते. आमसभेत आयपीएलच्या मेगा लिलावाची तारीख निश्चित होईल. याशिवाय टी-२० विश्वचषकातील भारतीय संघाच्या खराब कामगिरीचा आढावा घेतला जाईल.