नवी दिल्ली : मी वेगवान गोलंदाजांना चांगल्याप्रकारे खेळू शकतो, पण ज्यावेळी वेगवान गोलंदाज गोलंदाजीची सुरुवात करतो त्यावेळी डावातील पहिला चेंडू खेळण्यास इच्छुक नसतो, असे मत भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने व्यक्त केले. धवन आपला सलामीचा सहकारी रोहित शर्मा व सनरायजर्स हैदराबादचा माजी सहकारी डेव्हिड वॉर्नर यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत होता.
धवनने माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणसोबत इन्स्टाग्रामवर बातचित करताना म्हटले, ‘नाही, मी त्यासोबत सहमत नाही. मी वेगवान गोलंदाजांना खेळण्यास इच्छुक नाही, असे नाही. प्रत्येकाचे स्वतंत्र मत असते. मी सलामीवीर फलंदाज आहे. मी गेल्या ८ वर्षांपासून भारतासाठी ही भूमिका बजावत आहो. त्यामुळे मला निश्चितच वेगवान गोलंदाजांना खेळावे लागते. जर मी पहिल्या षटकात वेगवान गोलंदाजाला सामोरा गेलो नाही तर दुसऱ्या षटकात तर त्याला खेळावेच लागते.’धवनने आपल्या पदार्पणानंतर अनेक चांगल्या खेळी केल्या, पण कर्णधार विराट कोहलीसह संघाच्या फलंदाजीचा मुख्य कर्णधार म्हणून धवनचा सलामीचा सहकारी रोहित शर्मा आहे. पहिल्या चेंडूवर स्ट्राईक न घेण्याबाबत त्याचे स्पष्ट मत आहे, पण तो मानसिकतेसोबत जुळलेला मुद्दा असल्याचे त्याने म्हटले आहे. शिखर म्हणाला,‘होय मला सामन्याच्या पहिल्या चेंडूवर स्ट्राईक घेणे आवडत नाही. याबाबत प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास ज्यावेळी पृथ्वी शॉसारखा युवा खेळाडू संघात येतो आणि पहिला चेंडू खेळण्याबाबत त्याला सहज वाटत नसेल तर नक्कीच मी स्ट्राईक घेईन.’ धवन पुढे म्हणाला, ‘रोहितसोबत याची सुरुवात चॅम्पियन्स ट्रॉफीपासून झाली. जेथे मी त्याला स्ट्राईक घेण्यास सांगितले आणि ते पुढेही कायम राहिले. कारण स्थितीमध्ये फार बदल करणे मला आवडत नाही. वेगवान गोलंदाजांना अनुकूल स्थितीमध्ये वेगवान गोलंदाजांना खेळणे कुठल्याही सलामीवीर फलंदाजासाठी आव्हान असते. इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांना अनुकूल स्थितीत खेळताना मी वेगवान गोलंदाजांना खेळण्यास इच्छुक नसतो.’ रोहित व धवन २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून भारतीय डावाची सुरुवात करीत आहेत. (वृत्तसंस्था)
Web Title: coronavirus: play fast bowlers well - Shikhar Dhawan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.