नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी आटोपलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये (road safety world series 2021) देशविदेशातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. मात्र या स्पर्धेत सहभागी झालेले अनेक क्रिकेटपटू आता एकापाठोपाठ एक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण, सुब्रह्मण्यम बद्रिनाथ यांच्यानंतर आता इरफान पठाणलाही कोरोनाचा संसर्ग झा्ल्याचे समोर आलेआहे. (Sachin Tendulkar, Yusuf pathan, S. Badrinath, Irfan Pathan also tested corona positive, participated in road safety world series 2021)
इरफान पठाणने सोशल मीडिवरून ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये इरफान पठाण म्हणतो की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र मला कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. मी स्वत:ला आयसोलेट केले असून, मी घरीच क्वारेंटाइन आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच सर्वांनी मास्कचा वापर करा आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, असे आवाहन इरफान पठाणने केले आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह आलेला इरफान पठाण हा चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्यापूर्वी सुब्रह्मण्यम बद्रिनाथ, युसूफ पठाण आणि सचिन तेंडुलकर यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सुब्रह्मण्यम बद्रिनाथने ट्विट करून सांगितले की, मी सर्व आवश्यक खबरदारी घेत होतो. तसेच नियमित पणे चाचण्या घेत होतो. मात्र तरीही मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आहे. मला सौम्य लक्षणे दिसून येत आहेत.
हरमनप्रीत कौर कोरोना पॉझिटिव्ह भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची खेळाडू हरमनप्रीत कौर हिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार तिला कोरोनाची काही लक्षणे दिसत आहेत. मात्र तिला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.