नवी दिल्ली : भारतीय क्रीडा विश्वात खेळ सुरू करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात प्रशासक व्यस्त आहेत. कोरोनाच्या भीतीत खेळाडू मात्र सुरक्षेची चिंता व्यक्त करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने ऑगस्टमध्ये खेळ सुरू करण्याच्या योजनेविषयी त्यांना शंका वाटते.
क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी मागच्या आठवड्यात राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या प्रतिनिधींसोबत ऑनलाईन चर्चेच्यावेळी खेळ सुरू करण्यासाठी ऑगस्टचे लक्ष्य निर्धारित केल्याची माहिती दिली होती. वृत्तसंस्थेने याबाबत खेळाडूंचे मत व त्यांच्या योजना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मल्ल बजरंग पुनिया म्हणाला, ‘सध्या खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम होत आहे. केंद्र सरकारने खेळाडूंना सरावाची परवानगी बहाल केली, पण अनेक राज्यात निर्बंध कायम आहेत.’