मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात लाखो मजूर अडकून पडले आहेत. जवळपास दोन महिन्यांपासून काम नसल्यानं उदरनिर्वाहाचा प्रश्न, घरी परतण्यासाठी पैसे नाहीत, अशा विवंचनेत सापडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचं काम सोनू सूद करत आहे. त्याच्या या मदतीचं सगळ्यांकडून कौतुक होत आहे. आतापर्यंत सोनूनं हजारो मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली आहे.
चित्रपटांमध्ये खलनायक रंगवणारा सोनू सूद प्रत्यक्षात मात्र हजारो मजुरांसाठी हिरो ठरत आहे. अडचणीत सापडलेल्या मजुरांना सोनू मोलाची मदत करत आहे. त्याच्या या मदतीचं भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवननं तोंडभरून कौतुक केलं आहे. अडकलेल्या मजुरांनी त्यांच्या घरी पोहोचावं यासाठी एखाद्या नायकाप्रमाणे घेत असलेल्या प्रयत्नांना माझा सलाम, असं ट्विट धवन यानं केलं आहे. धवननं या ट्विटमध्ये सोनू सूदला टॅगदेखील केलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जवळपास सर्वच सेलेब्रिटी घरी थांबले आहेत. इतर सेलेब्रिटी घरातच आराम करत असताना सोनू मात्र रस्त्यावर उतरून मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक जण सोनूकडे घरी जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, त्यांच्या अडचणी सांगत आहेत. या सगळ्यांना सोनू आवर्जून मदतीचा हात देत आहे. मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करण्यापासून ते प्रवास करत असलेल्या राज्य सरकारांच्या परवानग्या मिळवण्यापर्यंतचे सर्व सोपस्कार सोनू पार पाडत आहे. त्यामुळे सगळ्यांकडून सोनूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Web Title: Coronavirus Shikhar Dhawan salutes Bollywood actor Sonu Sood for helping stranded migrant workers kkg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.