सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज स्मृती मानधना हिला सांगलीत होम क्वारंटाईन केल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी सोमवारी दिली. स्मृतीला २५ मार्च रोजी होम क्वारंटाईन करण्यात आले असून ५ एप्रिल रोजी त्याची मुदत संपणार आहे. दररोज तिची विचारपूस केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत २५ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चिंता व्यक्त होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा व सांगली, मिरज, कुपवाड महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजनाही आखल्या केल्या आहेत. त्यात परदेशातून आलेल्या २९२ जणांना होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
स्मृती मानधना फेबु्रवारीमध्ये आॅस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळून आली होती. येथून भारतात आल्यानंतर ती २३ मार्चला मुंबईहून सांगलीला घरी परतली. याबाबत डॉ. ताटे म्हणाले की, ‘मानधना सांगलीत आल्याची माहिती महापालिकेला २५ मार्चला मिळाली. आम्ही तात्काळ जाऊन तिला होम क्वारंटाईन केले आहे. त्यानुसार दररोज जाऊन तिची तपासणी आणि ती घरीच आहे का, याची खातरजमा केली जात आहे.’