अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर
जगावर कोरोनाचे संकट अजूनही कायम असले, तरी आता हळूहळू क्रीडाविश्वही पुन्हा एकदा सुरू होण्याची सुरुवात होत आहे. मात्र गेल्याच आठवड्यात स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याने क्रीडाविश्वात खळबळ माजली. त्यामुळेच कोरोनाचे संकट किती मोठे आहे, हे पुन्हा एकदा क्रीडाविश्वाने अनुभवले. सध्याच्या परिस्थितीत सामने खेळणे अत्यंत धोक्याचे असल्याचे सांगण्यात आल्यानंतरही जगातील अव्वल पुरुष टेनिसपटू जोकोविचने प्रदर्शनीय टेनिस स्पर्धा आयोजित करण्याचा धोका पत्करला. या स्पर्धेचा उद्देश चांगला होता. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. अखेरीस या स्पर्धेतूनच अनेक कोरोना रुग्ण निर्माण झाले व यात नामांकित व्यक्तींचाही समावेश आहे.
स्पर्धा स्थगित करावी, इतकी मोठी समस्या नाही उद्भवली. याशिवाय ला लिगा, प्रीमियर लीग यासारख्या फुटबॉल स्पर्धाही सुरू झाल्या. मात्र, स्पर्धा आयोजनासाठी जोकोविचसह काही खेळाडू आणि आयोजकांनी केलेली घाई वादग्रस्त ठरली. जोकोविचच्या ‘एड्रिया टूर’मध्ये प्रेक्षकांचा मोठा सहभाग अपेक्षित होता. या स्पर्धेदरम्यान खेळाडू मोकळेपणे चाहत्यांमध्ये मिसळले. यामुळे संसर्गाचा धोकाही वाढला. याशिवाय कोर्टबाहेर सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचेही खेळाडूंकडून अनेकदा उल्लंघन झाले. अनेकदा एकमेकांना आलिंगन देणे किंवा हस्तांदोलनासारखे प्रकार घडले. या स्पर्धेत पहिल्यांदा लक्ष वेधले गेले ते ग्रिगोर दिमित्रोव्ह कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा. यानंतर बोर्ना कॉरिक आणि व्हिक्टर ट्रोईकी यांची चाचणीही पॉझिटिव्ह आली. मात्र जोकोविच आणि त्याची पत्नी जेलेना हीसुद्धा जेव्हा कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा मात्र ही स्पर्धाच थांबली. काही दिवसानंतर जोकोविचच्या कोचिंग टीमचा सदस्य आणि एड्रिया टूरचा संचालक माजी विम्बल्डन विजेता गोरान इवानिसेविक हाही कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर जोकोविचने या स्पर्धेसाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात आली होती, असे म्हटले. मात्र, जर खरेच सर्व व्यवस्था करण्यात आली होती आणि त्यानंतरही इतक्या मोठ्या संख्येने खेळाडू आजारी पडले असतील, तर ती नक्कीच चिंतेची बाब आहे.
कोरोनाचा शिरकाव झालेली एड्रिया टूर ही एकमेव स्पर्धा नाही. याआधी पाकिस्तानमध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेले १० क्रिकेटपटूही कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले, शिवाय हे नाट्य येथेच संपले नाही. पाकचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीझ याने स्वत:ची व आपल्या परिवाराची खासगी डॉक्टरकडून कोरोना चाचणी केली तेव्हा ती निगेटिव्ह आली. या प्रकाराची माहिती त्याने सोशल मीडियावरून दिली. मात्र पीसीबीने पुन्हा त्याची चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे हाफीझ इंग्लंड दौºयावर जाणार की नाही, हे अद्याप निश्चित झाले नाही. शिवाय सर्व खेळाडूंची इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा चाचणी होईल. या सर्व घडामोडींमध्ये एक गोष्ट चांगली झाली आहे की, पाकिस्तानचा हा दौरा रद्द नाही झाला; पण या सर्व घडामोडींमध्ये खेळाडूंची आणि पीसीबीची स्थिती चांगली दिसत नाहीये. याउलट आता या सर्व प्रतिकूल परिस्थितीचा क्रिकेट व्यवस्थापक आणि खेळाडूंवर अधिक दबाव दिसून येईल.
Web Title: Coronavirus: Sports world stalled due to corona crisis begins; But ...!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.