कोरोना विषाणूमुळे जगभरातील संक्रमित रुग्णांची संख्या १ लाख ६० हजाराच्यावर गेली आहे. पण, त्यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्याही जवळपास ७८ हजार इतकी आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. भारतातही सोमवारपर्यंत ११६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. यात एकट्या महाराष्ट्रात ३७ जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे देशात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मॉल्स, शाळा, सिनेमागृह आदी सर्व बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यात सोमवारी टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मानं एक व्हिडीओ पोस्ट करून जगभरातील डॉक्टर्स आणि नर्सेसचे मनापासून आभार मानले आहेत.
कोरोना आजाराचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपययाोजना करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्विटरद्वारे खंबीर राहा, योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाविरुद्ध लढा देऊ असा संदेश देखील कोहलीने दिला होता. रोहितनंही त्याच्या चाहत्यांना स्वतःसह इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
तो म्हणाला,''हे दिवस सर्वांसाठी आव्हानात्मक आहेत. जगभरात कोरोना विषाणूनं थैमान माजवलं आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ते आपण कसं करू शकतो? तर आपल्या आजुबाजुला काय चाललंय, यावर लक्ष ठेवले पाहिजे. विषाणूची लक्षणे दिसल्यास त्वरीत नजीकच्या रुग्णालयाला कळवायला हवं.''
या व्हिडीओत रोहितनं डॉक्टर्स व नर्सचे आभार मानले. तो म्हणाला,''आपलं आयुष्य धोक्यात टाकून या विषाणूने संक्रमित असलेल्या लोकांना बरं करण्यासाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर्स आणि नर्सेसचे मी कौतुक करतो. त्यांचे मनापासून आभार. या विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या कुटुबीयांसाठी मी दुःख व्यक्त करतो.''