नवी दिल्ली : क्रिकेटची पुन्हा सुरुवात करण्याच्या दृष्टीने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नियम शिथिल झाल्यास १८ मे पासून कौशल्य आधारित आऊटडोअर सराव सुरू करण्याची तयारी बीसीसीआयने दाखवली आहे. कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी गुरुवारी हे संकेत दिले. लॉकडाऊनमध्ये अडकलेले भारतीय खेळाडू सध्या घरातच फिटनेसवर भर देत आहेत.धुमल म्हणाले, ‘खेळाडूंनी कौशल्यावर आधारित आऊटडोअर सराव सुरू करावा, असा बीसीसीआयचा विचार आहे, मात्र त्यासाठी आधी सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याची गरज आहे. खेळाडू प्रवास करू शकत नसल्यामुळे आम्ही पर्यायाच्या शोधात आहोत. स्वत:च्या घराजवळ असलेल्या मैदानात त्यांचा सराव होऊ शकतो का, याची चाचपणी केली जात आहे. लॉकडाऊननंतर काय करता येईल, यासाठी आम्ही वेळात्रक तयार केले. स्थानिक मैदानावर खेळाडूंनी सराव सुरू केल्यास नेट सत्रादरम्यान एका फलंदाजासाठी तीन गोलंदाजांची व्यवस्था करतायेईल.’सध्या भारतीय खेळाडूंपैकी मोहम्मद शमी हा धावण्याचा सराव करतो. उत्तर प्रदेशातील त्याच्या गावात स्वत:चे मैदान उपलब्ध आहे. अन्य खेळाडू मोठ्या शहरात असल्यामुळे घरी जिमद्वारे स्वत:चा फिटनेस राखत आहेत. बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी तसेच सहयोगी स्टाफसाठी विशेष अॅपची व्यवस्था केल्याची माहिती धुमल यांनी दिली. परिस्थिती पूर्ववत झाल्याशिवाय बीसीसीआय कुठल्याही शिबिराचे आयोजन करणार नाही, असेही धुमल यांनी स्पष्ट केले.‘आमचे सर्व खेळाडू पहिल्या दिवसापासून घरात आहेत. शारीरिक अंतर नियमाचे पालन होत आहे. खेळाडूंना आरोग्य सेतू अॅपचा वापर करायचा आहे, असा सरकारने आदेश केल्यास निर्देशांचे पालन केले जाईल,’ अशी हमी धुमल यांनी दिली. (वृत्तसंस्था)शास्त्री, कोहली यांचे मत जाणून घेणारवर्षअखेरीस भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा न झाल्यास क्रिकेट आॅस्ट्रेलिया बोर्डाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी आॅस्ट्रेलियन सरकार भारतीय संघाला प्रवासाची विशेष परवानगी देणार असल्याचे समजते.बीसीसीआयनेही हा दौरा खेळण्याची तयारी दाखवली आहे. मात्र याआधी भारतीय संघ आॅस्ट्रेलियात दोन आठवडे स्वत:ला क्वारंटाईन करेल असेही बीसीसीआयने स्पष्ट केले. दौºयाआधी भारतीय संघासाठी राष्ट्रीय शिबिर आयोजित करण्याचा विचार बीसीसीआय करीत आहे.रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी मागणी केल्यास खेळाडूंसाठीराष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यास बीसीसीआय तयार असल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या शिबिराचा विचार केला जाऊ शकतो .