Cheteshwar Pujara, Mohammad Rizwan : खराब फॉर्मामुळे भारताच्या कसोटी संघातून स्थान गमावणाऱ्या चेतेश्वर पुजाराची ( Cheteshwar Pujara ) बॅट कौंटी क्रिकेटमध्ये चांगलीच तळपलेली पाहायला मिळतेय. ससेक्स क्लबकडून ( Sussex ) खेळणाऱ्या पुजाराने कौंटी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात द्विशतक ( २०१* वि. डर्बीशायर), दुसऱ्या सामन्यात शतक ( १०९ वि. वॉर्करशायर) झळकावल्यानंतर त्याने शनिवारी डरहॅम ( DURHAM ) विरुद्ध द्विशतकी खेळी केली. या सामन्याच्या निमित्ताने India-Pakistan चे फलंदाज चेतेश्वर पुजारा व मोहम्मद रिझवान एकत्र खेळले आणि दमदार कामगिरी करून इंग्लिश गोलंदाजांना पुरून उरले.
डरहॅमचा पहिला डाव २२३ धावांवर गुंडाळल्यानंतर ससेक्सचा संघ मैदानावर उतरला. पण, सलामीवीर अली ओर ( २७) व मॅसोन क्रेन ( १३) हे माघारी परतल्यानंतर कर्णधार टॉम हैनेस ( ५४) व टॉम अल्सोप ( ६६) यांनी डाव सावरला. ही दोघंही माघारी परतल्यानंतर पुजारा नांगर रोवून उभा राहिला. त्याला टॉम क्लार्कची ( ५०) सुरेख साथ मिळाली. त्यानंतर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आणि पुजारा या जोडीनं कमाल केली. भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध कितीही ताणले गेले असले तरी इंग्लंडमध्ये या दोघांनी एकत्र येत इंग्रजांची धुलाई केली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १५४ धावा जोडल्या. रिझवान ७९ धावांवर माघारी परतला.