Chris Gayle, IPL 2022 Mega Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या Mega Auction साठी आयोजकांनी अंतिम यादी मंगळवारी जाहीर केली. IPL 2022 Mega Auction साठी नोंदणी केलेल्या १२१४ खेळाडूंपैकी केवळ ५९० खेळाडूंच्या नावांचा समावेश अंतिम यादीत करण्यात आला आहे. बंगळुरू येथे १२ व १३ फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्स ( निवृत्ती घेतल्यामुळे) आणि ख्रिस गेल हे दोन ट्वेंटी-२०तील सुपरस्टार खेळताना दिसणार नाहीत. गेलनं आयपीएल २०२२मध्ये खेळावं यासाठी त्याच्या माजी फ्रँचायझींनी विनंती केली होती, परंतु युनिव्हर्स बॉसनं एक भूमिका घेतली.
आयपीएलमध्ये ख्रिस गेल कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या संघाकडून खेळला. त्यानं आयपीएलमध्ये ३९.७२च्या सरासरीनं आणि १४८.९६ स्ट्राईक रेटनं ४९६५ धावा केल्या आहेत. त्यात ६ शतकं व ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय आयपीएल इतिहासात सर्वाधिक ३५७ षटकार त्याच्या नावावर आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सातव्या क्रमांकावर असून त्यानं २०११ व २०१२ साली RCBकडून खेळताना ऑरेंज कॅप नावावर केली होती.
आयपीएल २०२०मध्ये त्याला फक्त सात सामने खेळण्याची संधी मिळाली, तर आयपीएल २०२१त तो अपयशी ठरला. त्यानं १० सामन्यांत केवळ १९३ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याची बॅट थंडावलेली पाहायला मिळतेय आणि वय लक्षात घेता त्यानं आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला असावा. ट्वेंटी-२० क्रिकेट कारकीर्दिवर नजर टाकल्यास त्याच्या नावावर सर्वाधिक १४३२१ धावा आहेत. त्यात २२ शतकांचा समावेश आहे.
Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार गेलनं आयपीएलमध्ये खेळावं यासाठी काही फ्रँचायझींनी त्याला त्याचं नाव लिलावासाठी नोंदवावं, अशी विनंती केली होती. पण, गेलनं यंदाच्या वर्षी आयपीएलपासून दूर राहण्याचीच भूमिका घेतली आहे.