Covid strikes Sourav Ganguly’s home: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली हा नुकताच हॉस्पिटलमधून उपचार घेत घरी परतला. पुढील उपचार घरीच घेतल्यानंतर गांगुलीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. पण, त्याच्या घरात कोरोनानं शिरकाव केला. गांगुलीची कन्या साना गांगुलीसह घरातील तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. २० वर्षीय साना घरीच विलगिकरणात आहे.
सौरव गांगुलीला कोरोना झाल्यामुळे २७ डिसेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला डेल्टा व्हेरियंट कोरोना झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. गांगुलीच्या हृदयावर नुकतीच शस्त्रक्रियाही झाली होती. हॉस्पिटलमधून त्याला दोन दिवसांपूर्वीच डिस्चार्ज मिळाला आणि त्याच्यावर घरीच उपचार सुरू होते. आता त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु घरातील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले.
सौरव गांगुलीचे काका आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार देवाशीश गांगुली, त्याचा चुलत भाऊ सुवरदीप गांगुली आणि वहिनी जुईन गांगुली यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळली असून त्यांना घरीच विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. साना ही लंडनमध्ये शिक्षणासाठी असते आणि आता हिवाळ्याच्या सुट्टीत ती कोलकाता येथे परतली आहे.
मागील वर्षी गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिश गांगुली आणि आई निरूपा गांगुली यांनाही कोरोनाची लागण झाली होती.