जमैका, कॅरेबियन प्रीमिअर लीग : जमैका थल्लावाज संघाने सोमवारी झालेल्या लढतीत बार्बाडोस ट्रायडंट्स संघावर 4 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. ट्रायडंट संघाचे 141 धावांचे लक्ष्य जमैका संघाने 18.3 षटकांत सहज पार केले. यंदाच्या कॅरेबिनय प्रीमिअर लीगमधील जमैकाचा हा पहिलाच विजय ठरला. या सामन्यात युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलनं वर्ल्ड रेकॉर्ड केला. ट्वेंटी-20 तील या विक्रमाच्या शर्यतीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे प्रचंड पिछाडीवर आहेत. गेलनं नेमका असा कोणता विक्रम नोंदवला, ते जाणून घेऊया...
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा पल्ला पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. गेलनं 381 डावांत 39.07 च्या सरासरीनं आणि 147.55 च्या स्ट्राईक रेटनं 13013 धावा केल्या आहेत. त्यात सर्वाधिक 22 शतकांचा आणि 80 अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय गेलनं ट्वेंटी-20 1001 चौकार खेचले आहेत. अशी कामगिरी करणाराही तो पहिलाच फलंदाज आहे. त्याच्या नावावर 958 षटकार आहेत. षटकारांच्या बाबतीतही गेल अव्वल स्थानावर आहे.