जमैका : कॅरेबीयन प्रीमिअर लीगमध्ये विक्रमांचे सत्र कायम आहे. बुधवारी युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलनं खणखणीत शतकी खेळी करून ट्वेंटी-20 क्रिकेटमधील शतकांची संख्या 22 वर नेली. मात्र, त्याची शतकी खेळी व्यर्थ ठरवत सेंट किट्स अॅण्ड नेव्हील्स पॅट्रोओट्स संघाने बाजी मारली. जमैका थलावाज आमि पॅट्रोओट्स संघांमधील या सामन्यात तब्बल 39 षटकांत 483 धावांचा पाऊस पडला. गुरुवारी विंडीजच्या 21 वर्षीय डॉमिनिक ड्रॅक्सने विश्वविक्रमाला गवसणी घातली. 8000 ट्वेंटी-20 सामन्यांत जे कुणाला जमलं नाही, ते ड्रॅक्सने करून दाखवले. बार्बाडोस ट्रायडंट्स आणि सेंट किट्स अॅण्ड नेव्हील्स पॅट्रोओट्स यांच्यातील सामन्यात ड्रॅक्सने हा विक्रम केला. बुधवारी पॅट्रोओस्ट संघाने 242 धावांचे लक्ष्य पार करतान गेलची शतकी खेळी व्यर्थ ठरवली होती. त्याच पॅट्रोओस्ट संघाच्या ड्रॅक्सने पराक्रम केला, परंतु यावेळी संघाला विजय मिळवण्यात अपयश आले. ट्रायडंट्स संघाच्या 2 बाद 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पॅट्रोओस्ट संघ 9 बाद 168 धावांपर्यंतच मजल मारू शकला. पण, या सामन्या 11 व्या क्रमांकावर आलेल्या ड्रॅक्सने तुफान फटकेबाजी करताना विश्वविक्रमाला गवसणी घातली. जॉन्सन चार्ल्स ( 52), लेनिको बाऊचर ( 62*) आणि जेपी ड्युमिनी ( 43*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ट्रायडंट्स संघाने 20 षटकांत 2 बाद 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात इव्हान लुईस ( 64) वगळता पॅट्रीओट्सच्या अन्य फलंदाजांना अपयश आले. जमैका संघाविरुद्ध कॅरेबीयन प्रीमिअर लीगमधील सर्वात जलद अर्धशतकाची नोंद करणाऱ्या लुईसने 41 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकार खेचत 64 धावा केल्या. नेपाळच्या संदीप लामिछाने याने 22 धावांत 3 विकेट्स घेत पॅट्रीओट्सला विजयापासून वंचित ठेवले. जेसन होल्डर आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
या सामन्यात 11 व्या क्रमांकावर आलेल्या ड्रॅक्सने 14 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 34 धावांची खेळी केली. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 11 व्या क्रमांकावरील ही सर्वोत्तम खेळी ठरली.