पाकिस्तानचा अष्टपैलू फलंदाज शोएब मलिकनं सोमवारी कॅरेबिनय प्रीमिअर लीगमध्ये दमदार खेळी करताना विक्रमाला गवसणी घातली. शोएबनं गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना बार्बाडोस ट्रायडंट संघावर विजय मिळवला. मलिकनं या सामन्यात 19 चेंडूंत 32 धावा केल्या. वॉरियर्सने हा सामना 30 धावांनी जिंकला. वॉरियर्सच्या 3 बाद 218 धावांचा पाठलाग करताना ट्रायडंट्स संघाला 8 बाद 188 धावा करता आल्या.
प्रथम फलंदाजी करताना ब्रँडन किंगने 72 चेडूंत 10 चौकार व 11 षटकार खेचून नाबाद 132 धावा केल्या. चंद्रपॉल हेमराजने 27 धावा करून त्याला सलामीला उत्तम साथ दिली. पण, मधल्या फळीला अपयश आलं. त्यानंतर शोएबनं किंगसोबत 97 धावांची भागीदारी केली. मलिकनं 3 षटकारांच्या मदतीनं 32 धावा कुटल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना जोनाथन कार्टर ( 49) आणि अॅलेक्स हेल ( 36) यांनी संघर्ष केला, परंतु त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. वॉरियर्सच्या रोमारियो शेफर्डने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
या सामन्यात 32 धावा करून शोएबनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 9000 धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा फलंदाज बनला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली ( 8556), रोहित शर्मा ( 8312) आणि सुरेश रैना ( 8392) यांच्यासह शोएबनं ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नरला ( 8803) मागे टाकत चौथे स्थान पटकावले. शोएबने 356 ट्वेंटी-20 सामन्यांत 9014 धावा केल्या आहेत आणि 142 विकेट्सही घेतल्या आहेत.
वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. गेलनं 394 ट्वेंटी-20त 13051 धावा केल्या आहेत. त्यानंतर न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकलम ( 370 सामने 9922 धावा) आणि विंडीजचा किरॉन पोलार्ड ( 489 सामने 9757 धावा) यांचा क्रमांक येतो. शोएबनं राष्ट्रीय संघाकडून 35 कसोटी, 287 वन डे आणि 111 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत.