कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) बुधवारी त्रिनबागो नाइट रायडर्सचा फलंदाज लेंडल सिमन्सनं तुफान फटकेबाजी केली. सात सामन्यांत अपराजित मालिका कायम राखणाऱ्या नाइट रायडर्स संघाचा बुधवारी सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रीओट्स संघाशी सामना झाला. यात सलामीवीर सिमन्सच्या फटकेबाजीनं सर्वांचे लक्ष वेधले. सिमन्सची ही फटकेबाजी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) पाहता येणार नाही.
सिमन्स आणि आमीर जंगू हे रायडर्ससाठी सलामीला आले. पण, जंगू ( 6) धावबाद झाला. त्यानंतर कॉलीन मुन्रो ( 9) रिटायर्ड हर्ट झाला. डॅरेन ब्राव्हो आणि सिमन्स यांनी रायडर्ससाठी खिंड लढवली. ब्राव्हो 2 षटकार व 2 चौकारांसह 36 धावा करून माघारी परतला. सिमन्सनं 63 चेंडूंत 7 चौकार व 6 षटकारांसह 96 धावा केल्या. अखेरच्या षटकात डॉमिनिक ड्रॅक्सनं त्याला बाद केलं. चार धावांनी त्याचं शतक हुकलं.
आयपीएल 2020च्या लिलावात लेंडन सिमन्स अनसोल्ड राहिला. त्यानं आयपीएलमध्ये 29 सामन्यांत 1079 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व 11 अर्धशतकांचा समावेश आहे. 2014च्या मोसमात त्यानं नाबाद 100 धावा केल्या होत्या.