कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या ( सीपीएल) उद्धाटनीय लढतीत त्रिनबागो नाइट रायडर्सनं विजय मिळवताना गयाना अॅमेझॉन वॉरियर्सवर 4 विकेट्स राखून विजय मिळवला. पण, पहिल्या दिवसाच्या दुसरा सामना चुरशीचा झाला. बार्बाडोस ट्रायडंट्स आणि सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स संघातील या लढतीत रशीद खानच्या अष्टपैलू कामगिरीनं सर्वांची वाहवाह मिळवली. ट्रायडंट्सच्या 9 बाद 153 धावांचा पाठलाग करताना पॅट्रीओट्स संघाला 5 बाद 147 धावा करता आल्या. रशीदनं नाबाद 26 धावा आणि दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात रशीदनं एक अफलातून फटका मारला आणि तो फटका मारून महेंद्रसिंग धोनीच्या हॅलिकॉप्टर शॉट्सची आठवण झाली.
प्रथम फलंदाजी करताना ट्रायडंट्सचे तीन फलंदाज अवघ्या 8 धावांत माघारी परतले होते. त्यानंतर कायले मेयर्स ( 37) आणि कर्णधार जेसर होल्डर ( 38) यांनी संघाचा डाव सावरला. ही दोघं माघारी परतल्यानंतर ट्रायडंट्सची पुन्हा घसरगुंडी झाली. मिचेल सँटनर (20) आणि रशीद यांनी तळाला खिंड लढवताना संघाला 153 धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. पॅट्रीओट्सकडून सोहैल तन्वीर, शेल्डन कॉट्रेल आणि रयाद एमरिट यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना पॅट्रीओट्सलाही धक्के बसले. जोशूआ डी सिल्वा ( 41*) आणि बेन डंक ( 31) यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु अवघ्या 6 धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. सँटनर आणि रशीद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
पाहा व्हिडीओ...