कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) आतापर्यंत अपराजित राहिलेल्या त्रिनबागो नाइट रायडर्स संघानं मंगळवारी जमैका थलाव्हास संघाला नमवण्याचा पराक्रम केला. सीपीएलमधील त्यांचा हा सलग सातवा विजय ठरला. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) लिलावात अनसोल्ड राहिलेल्या कॉलीन मुन्रोनं आज फटकेबाजी करताना नाइट रायडर्सला 4 बाद 184 धावांपर्यंत मजल मारून दिली. कर्णधार किरॉन पोलार्डनंही त्याला साजेशी साथ दिली. त्यानंतर गोलंदाजांनी कमाल करताना संघाला विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या सिमन्स आणि नरीन यांना पहिल्या विकेटसाठी 32 धावा जोडता आल्या. नरीन 11 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 29 धावांत माघारी परतला. त्यानंतर सिमन्स आणि मुन्रो यांनी संघाची धुरा सांभाळली, परंतु संदीप लामिछानेनं ही जोडी फोडली. सिमन्स 25 धावांवर बाद झाला. टीम सेईफर्ट ( 18) लगेच बाद झाला. पण, मुन्रो आणि पोलार्ड यांनी अखेरपर्यंत खिंड लढवली. मुन्रोनं 54 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकारांसह 65 धावा केल्या, तर पोलार्डनं 16 चेंडंत 1 चौकार व 3 षटकार खेचताना नाबाद 33 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना चॅडविक वॉल्टन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. जेर्मेन ब्लॅकवूड ( 12) आणि एनक्रूमाह बोनर ( 26) यांना पिएर आणि फवाद अहमद यांनी बाद केले. ग्लेन फिलीपनं 31 चेंडूंत 41 धावा केल्या, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. कार्लोस ब्रेथवेट आणि आंद्रे रसेल यांनी अखेरच्या षटकांत जोरदार फटकेबाजी केली, परंतु त्यांनाही अपयश आलं. अखेरच्या षटकात विजयासाठी 38 धावांची गरज असताना थलाव्हासला 18 धावा जोडता आल्या. किरॉन पोलार्डनं ते षटक फेकले. रायडर्सनं हा सामना 19 धावांनी जिंकला. आंद्रे रसेलनं 23 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 50 धावा केल्या, तर ब्रेथवेट 21 धावांवर नाबाद राहिला.