कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) रविवारी तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. कॉलीन मुन्रो आणि डॅरेन ब्राव्हो यांच्या अर्धशतकी खेळीनंतर त्रिनबागो नाइट रायडर्सचा कर्णधार किरॉन पोलार्डनं 241च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी केली. या त्रिकुटाच्या चौकार-षटकाराच्या आतषबाजीच्या जोरावर नाइट रायडर्स संघानं सीपीएलमध्ये रविवारी बार्बाडोस ट्रायडंट्सवर 19 धावांनी विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना नाइट रायडर्सच्या सुनील नरीनला ( 8) सलग तिसरी अर्धशतकी खेळी करता आली नाही. त्यानं आज सावध पवित्रा घेतला होता. लेंडल सिमन्स ( 21) पहिला माघारी परतल्यानंतर आणि 9.3 षटकापर्यंत खेळपट्टीवर असूनही नरीनला केवळ 8 धावाच करता आल्या. मुन्रोनं 30 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार खेचून 50 धावा केल्या. त्यानंतर डॅरेन ब्राव्हो आणि पोलार्डची जोडी जमली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 98 धावांची भागीदारी केली. ब्राव्होनं 36 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 54, तर पोलार्डनं 17 चेंडूंत 1 चौकार व 4 खणखणीत षटकार खेचून नाबाद 41 धावा केल्या. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर नाइट रायडर्सने 3 बाद 185 धावा उभारल्या.