CPL 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वातील जेतेपदाची लढत ही सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts And Nevis Patriots ) व सेंट ल्युसीया किंग्स ( St Lucia Kings) यांच्यात होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात पॅट्रीओट्सच्या एव्हिन लुईस आणि युनिव्हर्स बॉस क्रिस गेल यांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. गेलनं या सामन्यात CPLमधील एक खास विक्रमही नोंदवला, तर लुईसच्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सचा संघ आनंदात दिसला. या सामन्यात युनिव्हर्स बॉस गेलच्या बॅटीचे दोन तुकडे झालेले पाहायला मिळाले.
गयाना वॉरियर्स आणि पॅट्रीओट्स यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वॉरियर्सनं ९ बाद १७८ धावा केल्या. शिमरोन हेटमयारनं २० चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४५ धावा करून वॉरियर्सच्या धावसंख्येत मोठा वाटा उचलला. ब्रेडन किंग्स ( २७), चंद्रपॉल हेमराज ( २७) व कर्णधार निकोलस पूरन ( २६) यांनी हातभार लावला. पॅट्रीओट्सला रोखण्यासाठी या धावा कमीच पडल्या. ख्रिस गेल व एव्हीन लुईस यांनी पहिल्या विकेट्ससाठी ७६ धावांची भागीदारी करून विजयाचा मजबूत पाया रचला. गेल २७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावा करून माघारी परतला. या खेळीदरम्यान त्यानं CPLमध्ये २५०० धावांचा पल्लाही पार केला.
त्यानंतर लुईस आणि कर्णधार ड्वेन ब्राव्हो यांनी सुसाट फटकेबाजी केली. ब्राव्हो ३४ धावांवर बाद झाल्यानंतर लुईसनं ३९ चेंडूंत ३ चौकार व ८ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहून संघाचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. आयपीएलमध्ये लुईस राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. बेन स्टोक्सच्या बदली RRनं त्याला करारबद्ध केले आहे. या सामन्यापूर्वी लुईसनं शतकी खेळीही केली होती.
Web Title: CPL 2021: Chris Gayle's bat broke after a rocketing delivery from Odean Smith, Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.