Join us  

Imran Tahir ची कमाल; वयाच्या ४५ व्या वर्षी गोलंदाजीतील 'शतकी' कामगिरीसह रचला इतिहास

या स्पर्धेत १०० विकेट्सचा टप्पा गाठत त्याने खास विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 6:15 PM

Open in App

Imran Tahir Created History With 100 Wickets : दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू इम्रान ताहीर (Imran Tahir) याने टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये या खेळाडूनं उतार वयात लक्षवेधी कामगिरी करून दाखवली आहे. या स्पर्धेत १०० विकेट्सचा टप्पा गाठत त्याने खास विक्रमाला गवसणी घातली. तो गोलंदाजीत शतकी कामगिरी करणारा सर्वात वयोवृद्ध गोलंदाज ठरला आहे. 

कॅरेबियन लीगमधील त्याची सर्वोच्च कामगिरी

आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या ताफ्यातून खेळताना दिसलेला इम्रान ताहीर कॅरेबियन लीगमध्ये गयाना अ‍ॅमेझॉन वॉरियर्सच्या संघाचे नेतृत्व करत आहे. २०१८ पासून दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये खेळताना दिसते. आतापर्यंत त्याने ७२ सामन्यातील ७१ डावात १७.४२ च्या सरासरीसह १०१ विकेट्स मिळवल्या आहेत. या स्पर्धेत २२ धावा खर्च करून ४ विकेट्स ही त्याने नोंदवलेली सर्वोच्च कामगिरी आहे.  

CPL मध्ये १०० विकेट्स घेणारा तो क्रिकेट जगतातील तिसरा गोलंदाज

वेस्ट इंडीजमधील कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये १०० विकेट्स घेणारा तो क्रिकेट जगतातील तिसरा गोलंदाज आहे. या लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा ड्वेन ब्रावोच्या नावे आहे. त्याने २०१३ पासून आतापर्यंत १०६ सामन्यातील ९७ डावात ११२९ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा नंबर लागतो. ३६ वर्षीय फिरकीपटूनं २०१३ पासून आतापर्यंत ११२ सामन्यातील ११० डावात १२२ विकेट्स घेतल्या आहेत.   

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेटद. आफ्रिकावेस्ट इंडिज