Join us

Nicholas Pooran नं मोडला गेलचा विक्रम; सर्वाधिक सिक्सर मारण्यात नंबर वन

याआधी हा विक्रम स्फोटक आणि धाकड फलंदाज ख्रिस गेलच्या नावे होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 15:50 IST

Open in App

Nicholas Pooran Most Sixes in a Calender Year: कॅरेबियन स्फोटक फलंदाज निकोलस पूरन याने घरच्या मैदानातील लीगमध्ये धुमाकूळ घातला आहे. कॅरेबियन लीगमध्ये   त्रिनिदाद नाइट रायडर्सकडून खेळताना त्याने टी-२० क्रिकेटमध्ये वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विक्रम सेट केला आहे. याआधी हा विक्रम स्फोटक आणि धाकड फलंदाज ख्रिस गेलच्या नावे होता. 

पूरननं  ख्रिस गेलचा विक्रम काढला मोडीत

एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम बरीच वर्षे  'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलच्या नावे होता.  कॅरेबियन लीगमध्ये  वार्नर पार्कच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात निकोलस पूरनच्या भात्यातून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाले.  सेंट किट्स अँड नेव्हिस पेट्रियट्स विरुद्धच्या सामन्यात त्याने  ४३ चेंडूत ९७ धावा केल्या. या खेळीत त्याने चौकार षटकारांची अक्षरश: आतषबाजी केली. यात ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडीत निघाला. पूरन याने आपल्या खेळीत ९ षटकार मारले. 

टी-२० क्रिकेटमधील नवा 'सिक्सर किंग'

ख्रिस गेलनं २०१५ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये १३५ षटकारासह विक्रम प्रस्थापित केला होता. एवढेच नाही २०११ या वर्षात ११६ आणि २०१२ च्या हंगामात  १२१ षटकारांसह ख्रिस गेलच टॉप तीनमध्ये होता. पण आता निकोलस पूरन सिक्सरचा नवा किंग झाला आहे.निकोलस पूरन याने यंदाच्या वर्षी आतापर्यंत खेळलेल्या टी-२० मध्ये १३९ षटकार मारले आहेत.

निकोलस पूरनला IPL मध्ये या रेकॉर्डचा किती होईल फायदा?

आपल्या तुफान खेळीच्या जोरावर त्याने त्रिनिदाद नाइट रायडर्सच्या संघाला विजय मिळवून दिलाच. पण आयपीएलच्या आगामी मेगा लिलावाआधी आपला भाव वाढवणारा पराक्रम करून दाखवला आहे. घरच्या मैदानातील तुफान खेळी त्याला आगामी मेगा लिलावात किती भाव मिळणार? ते नक्कीच पाहण्याजोगे असेल. 

 टी-२० क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांची यादी 

  • १३९* - निकोलस पूरन (२०२४)
  • १३५ - ख्रिस गेल (२०१५)
  • १२१ - क्रिस गेल (२०१२)
  • ११६ - ख्रिस गेल (२०११)
  • ११२ - ख्रिस गेल (२०१६)
  • १०१ - क्रिस गेल (२०१७)
  • १०१ - आंद्रे रसेल (२०१९)
  • १०० - ख्रिस गेल (२०१३)
टॅग्स :टी-20 क्रिकेटआयपीएल २०२४कॅरेबियन प्रीमिअर लीग