CPL, T20 League : पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज आझम खान त्याच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतो. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने केलेल्या चुकांमुळे आझमला नकारात्मक प्रसिद्धी मिळाली. सध्या वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीगचा (CPL) थरार रंगला आहे. यामध्ये पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज आझम खानसोबत एक हास्यास्पद घटना घडली. वाऱ्याच्या वेगाने आलेल्या चेंडूने आझमला चीतपट केले. सीपीएलमधील एका सामन्यादरम्यान आझम खान फलंदाजी करत होता. त्यानंतर घातक बाउन्सर चेंडू त्याच्या मानेवर आदळला आणि आझमला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. आझमच्या मानेवर चेंडू आदळला आणि त्याचा तोल गेला, त्यामुळे त्याची बॅट स्टम्पला लागली आणि तो बाद झाला. आझम खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या सामन्यात अँटिग्वा संघाने प्रथम फलंदाजी करताना १६८ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून जेव्हा गयाना संघाकडून आझम खान डावाच्या बाराव्या षटकात फलंदाजी करत होता तेव्हा एक अनोखी घटना घडली. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शमर स्प्रिंगरने घातक बाउन्सरचा मारा केला. यावर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या आझम खानकडून चूक झाली आणि चेंडू त्याच्या मानेला लागला. चेंडू लागताच आझमचा तोल गेला आणि त्याची बॅट स्टम्पला लागली. त्यामुळे आझम खान नऊ चेंडूत एका चौकारासह नऊ धावा करुन तंबूत परतला.
आझम खान बाद झाल्यानंतर मात्र अखेरीस रोमॅरियो शेफर्ड आणि ड्वेन प्रिटोरियस यांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. प्रिटोरियसने अखेरच्या षटकात पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमिरच्या चेंडूवर तीन चौकार आणि एक षटकार खेचून एकूण १८ धावा केल्या. खरे तर त्यांच्या संघाला विजयासाठी १६ धावांची गरज होती. अशा प्रकारे गयाना संघाने पहिल्या सामन्यात शेवटच्या चेंडूवर अँटिग्वाचा तीन गडी राखून पराभव करत विजय साकारला. प्रिटोरियसने १० चेंडूत तीन चौकार आणि एक षटकारासह २० धावांची नाबाद खेळी केली, तर शेफर्डने १६ चेंडूत चार षटकारांसह नाबाद ३२ धावा कुटल्या.