पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याला आणखी एक मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी अख्तरची सरकारी चॅनेल PTVवर इभ्रत काढण्यात आली होती आणि आता त्याला चॅनेलनं बॅन केलं आहे. त्यामुळे आता या चॅनेलकडून प्रसारित करण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात शोएब अख्तरला भाग घेता येणार नाही. चॅनेलनं ट्विट करून याबाबत माहिती दिली आणि PTVनं अँकर नौमान नियाज याच्यासोबत लाईव्ह शोमध्ये झालेल्या वादाची चौकशी होणार आहे. चॅनेलच्या या निर्णयामुळे अख्तरची कमाई बंद झाली आहे.
पण, यानंतर रावळपिंडी एक्स्प्रेस अख्तरनंही कठोर शब्दात त्याचे मत मांडले. त्यानं ट्विट केलं की,ही चांगली मस्करी आहे. मी २२० मिलियन पाकिस्तानी आणि जगभरातील लोकांसमोर ऑन एअर राजीनामा दिला आहे. PTV वेडी आहे काय? मला ऑफ एअर करणारे हे कोण?
नेमकं काय घडलं?पाकिस्तानच्या 'पीटीव्ही' वाहिनीवर 'गेम ऑन' नावाचा शो सुरू होता. यात शोएब अख्तरनं पाकिस्तानचे गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस राऊफ यांचं कौतुक केलं. पाकिस्तान सुपर लीगमधील लाहौर कलंदर्स टीममधून हे दोन गोलंदाज पुढे आले, असं शोएब अख्तरनं म्हटलं. त्यावर कार्यक्रमाचा अँकर नौमान नियाज यांनी अख्तरला रोखलं. "शाहीन पाकिस्तानच्या अंडर-१९ क्रिकेट संघातून आला आहे", असं नौमान यांनी म्हटलं. त्यावर शोएबनं "मी हॅरीस राऊफ याच्याबाबत बोलतोय", असं म्हटलं. त्यावर नौमान यांचा पारा चढला आणि त्यांनी शोएब अख्तरचा अपमान करण्यास सुरुवात केली. "तू माझ्याशी असभ्य भाषेत बोलत आहेस. मी इथं सांगू इच्छितो की जर तुला ओव्हरस्मार्ट बनायचं आहे तर तू शोमधून निघून जाऊ शकतोस आणि हे मी तुला ऑन एअर सांगत आहे", असं नौमान म्हणाले.