क्रिकेट ऑस्ट्रेलियानं यंदाच्या वर्षातील संघाचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्यात कसोटी क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाच्या अॅशेस मालिकेचाही (Ashes Series) समावेश आहे. ऑस्ट्रेलियाच्या यजमानपदाखाली होणाऱ्या अॅशेस मालिकेत फॅन्सना मोठा बदल पाहायला मिळणार आहे. ८ डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून पहिला सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळणार आहे. उभय संघांमध्ये २७ नोव्हेंबरपासून एकमेव कसोटीला सुरूवात होणार आहे. २०१८मध्ये कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर अफगाणिस्ताननं सहा कसोटी सामने खेळले आहेत. कसोटीच्या महासंग्रामाला सुरुवात होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंड व श्रीलंका या संघांविरुद्ध वन डे व ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ घरच्या मैदानावर अॅशेस मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. मालिकेची सुरुवात ब्रिस्बेन येथून होईल. गतवर्षी याच मैदानावर भारतीय संघानं यजमान ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षांची अपराजित राहण्याची मालिका खंडीत केली होती. ब्रिस्बेन कसोटीनंतर १६ डिसेंबरला अॅडलेडवर एकमेव डे नाईट ( दिवस-रात्र) कसोटी सामना खेळला जाईल. बॉक्सिंग डे कसोटी नेहमी एमएसजी क्रिकेट मैदानावर होते, परंतु यावेळी ही कसोटीत बदल पाहायला मिळत आहे. नव्या वर्षाचा पहिला सामना सिडनीत आणि अखेरचा सामना १४ जानेवारीपासून पर्थवर खेळला जाईल. २६ वर्षांत प्रथमच अॅशेसजचा अखेरचा सामना सिडनीच्या जागी पर्थवर होणार आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे सीईओ म्हणाले,''अॅशेस मालिकेच्या आयोजनासाठी आम्ही उत्सुक आहोत. मागील अॅशेस मालिका शानदार झाली आणि त्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं होतं. आशा करतो की यावेळेसही असेच होईल.''