Join us

India vs Pakistan vs Australia : PCB पाठोपाठ आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाची भारत-पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकेसाठी बॅटिंग!

India vs Pakistan vs Australia : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेटला सुरुवात होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 16:30 IST

Open in App

India vs Pakistan vs Australia : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या ( PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातल्या क्रिकेटला सुरुवात होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी फक्त India vs Pakistan नव्हे तर ऑस्ट्रेलिया अशी तिंरगी मालिकेचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर ना बीसीसीआयचे अनुराग ठाकूर यांनी पाकिस्तानसोबत खेळायचे की नाही हा निर्णय सरकारचा असेल, असे स्पष्ट सांगितले होते. पण, आता क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही PCBच्या हो ला हो देताना India vs Pakistan vs Australia या तिरंगी मालिकेच्या आयोजनाची उत्सुकता दाखवली आहे. भविष्यात तसा प्रयत्नही करणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी निक हॉकली यांनी भारत-पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्या तिरंगी मालिकेचे यजमानपद भूषविण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. ''भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना जगभरात सर्वांना पाहायचा आहे,''असे हॉकली म्हणाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फक्त आयसीसी स्पर्धांमध्ये आणि आशिया चषक स्पर्धेत क्रिकेट खेळले जाते. २०१२ पासून या शेजारील राष्ट्रांमध्ये द्विदेशीय मालिका खेळवली गेलेली नाही, तर २००८ पासून कसोटी मालिकाही झालेली नाही. 

हॉकली म्हणाले, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बैठकीत हा मुद्दा चर्चिला गेलेला नाही, परंतु माझं वैयक्तिक मत विचाराल तर मला ही संकल्पना आवडली आहे. भूतकाळातही अशी मालिका यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे या तिरंगी मालिकेचे आयोजन करण्यासाठी आम्ही तयार आहोत. ऑस्ट्रेलियातही भारत व पाकिस्तानचा मोठा चाहतावर्ग राहतोय. जगात प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा हा सामना आहे.  

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला सुरूवात होणार आहे आणि २३ मार्चला भारत-पाकिस्तान  यांच्यात २३ ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सामना होणार आहे. या सामन्याची तिकीटं तासाभरात विकली गेली. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानआॅस्ट्रेलिया
Open in App