मेलबर्न - एकीकडे इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या अॅशेस क्रिकेट मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियन संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. आजपासून सुरू झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीमध्येही ऑस्ट्रेलियन संघाने पकड मिळवली आहे. मात्र दुसरीकडे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील वाद संपण्याचे नाव घेत नाही आहेत. आता स्वत: एस्कॉर्ट असल्याचा दावा करणाऱ्या महिलेने एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
आज ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये एक नवा विवाद समोर आला आहे. हा बॉक्सिंग डे कसोटीचा पहिलाच दिवस होता. आजच एका वृत्तपत्राने त्यांना एका महिलेची रेकॉर्डिंग मिळाल्याचा दावा केला आहे. या रेकॉर्डिंगमध्ये सदर महिला ती एक एस्कॉर्ट असल्याचा दावा करत असून, ती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे माजी प्रमुख सीन कॅरोल यांच्याशी बोलत आहे. फोनवर बोलताना सदर महिलेने एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवर कोकेनचे सेवन करून अनेक महिलांसंह कपड्यांविना नाचल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, हे रेकॉर्डिंग द संडे एज वृत्तपत्राला कुणी पाठवले हे अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने तपासासाठी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.
करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार ही रेकॉर्डिंग आताची नाही तर काही वर्षे जुनी आहे. त्यामुळे ज्या खेळाडूवर हे आरोप करण्यात आले आहेत. ते सुद्धा सिद्ध करणे कठीण होणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे चिफ एक्झिक्युटिव्ह निक हॉकले यांनी सांगितले की, वृत्तपत्रात छापल्या गेलेल्या वृत्तामध्ये फार तथ्य नाही आहे. सध्यातरी पोलिसांकडे तक्रार केली गेली आहे. तसेच तपासानंतरच याबाबत काही सांगता येईल.
काही दिवसांपूर्वीच अॅशेस मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी टीम पेन याच्यावर अशाच प्रकारचे आरोप झाल्याने त्याला ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद सोडावे लागले होते. टीम पेनचे अश्लिल चॅट आणि फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.