भारतीय संघानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटीत विजय मिळवून २०२१ वर्षाचा शेवट गोड केला. पण, वैयक्तिक कामगिरीचा विचार केल्यास विराटसाठी हे वर्ष तितके खास राहिले नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं २०२१मधील सर्वोत्तम कसोटी एकादश संघ जाहीर केला आणि त्यात विराटला स्थान मिळालेले नाही. पण, भारताच्या चार खेळाडूंनी या संघात स्थान पटकावले आहे. श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने याची कर्णधार म्हणून निवड केली आहे. या संघात पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना स्थान मिळाले आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या फक्त मार्नस लाबुशेनला स्थान पटकावता आले आहे.
सलामीवीर म्हणून रोहित शर्मा व करुणारत्ने यांची निवड केली गेली आहे. रोहितनं या वर्षात दोन शतकं व चार अर्धशतकं झळकावली आहेत आणि ४७.६८च्या सरासरीनं ९०६ धावा केल्या आहेत. करुणारत्नेनं ही कसोटीत ६९.३८च्या सरासरीनं ९०२ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतकं व ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
मधल्या फळीत लाबुशेनसह इंग्लंडचा कर्णधार जो रूट व पाकिस्तानचा फवाद आलम यांना संधी दिली गेली आहे. लाबुशेननं ६५.७५च्या सरासरीनं २ शतकं व ४ अर्धशतकांसह ५२६ धावा केल्या आहेत. जो रुटनं यंदाचे वर्ष गाजवलेतय. कसोटीत त्याच्या नावावर ६ शतकं आणि ४ अर्धशतकं आहेत आणि त्यानं ६१ च्या सरासरीनं १७०८ धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा आलमनं ५७.१०च्या सरासरीनं ५७१ धावा केल्या आहेत. त्यात ३ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे.