क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेत अफगाणिस्तानचा दौरा पुढे ढकलला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात ऑगस्टमध्ये नियोजित ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे. पण, अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीत देशातील महिला आणि मुलींच्या मानवी हक्कांची बिघडलेली स्थिती पाहता ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. खरं तर गेल्या तीन वर्षांत ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघाविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार देण्याची ही तिसरी वेळ आहे.
मागील वर्षी भारतात झालेल्या वन डे विश्वचषकात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आले होते. अफगाणिस्तानचा ट्वेंटी-२० कर्णधार राशिद खानसह संघातील काही खेळाडूंचा बिग बॅश लीग (BBL) करार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या या ट्वेंटी-२० लीगमध्ये आशियाई देशातील काही स्टार क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत.
ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्धचा एक कसोटी सामना रद्द केला, जो नोव्हेंबर २०२१ मध्ये होणार होता. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या वन डे मालिकेतून माघार घेतली, जी अफगाणिस्तानने आयोजित केली होती आणि ती UAE मध्ये खेळवली जाणार होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, ऑस्ट्रेलिया सरकारचा उद्देश असा आहे की, अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक वाईट होत आहे. या कारणास्तव आम्ही आमच्या आधीच्या निर्णयावर ठाम असून, अफगाणिस्तानविरुद्धची द्विपक्षीय मालिका पुढे ढकलत आहोत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जगभरातील क्रिकेटमधील महिला आणि मुलींच्या सहभागाला पाठिंबा देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे भविष्यात दोन्हीही देशांमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरळीत होण्यासाठी आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाशी आणि आयसीसीशी जवळून काम करू, असेही नमूद करण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे २०२३ मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाने वन डे मालिकेतून माघार घेतली होती. तेव्हा अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने बिग बॅश लीगमधून माघार घेण्याची धमकी देत ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती.