aus vs ind test series : २२ तारखेपासून सुरू होत असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमान ऑस्ट्रेलियाने खास योजना आखल्याचे दिसते. भारताविरुद्धच्या या महत्त्वाच्या मालिकेसाठी कांगारुंनी आपल्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे. भारतीय संघाला मोठ्या कालावधीनंतर आपल्या मायदेशात कसोटी मालिका गमवावी लागली. भारत दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडने यजमानांचा ३-० ने दारुण पराभव केला. बंगळुरू, पुणे आणि मग मुंबईत झालेल्या अखेरच्या सामन्यातही भारतीय खेळाडू सपशेल अपयशी ठरले. या पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला मोठा संघर्ष करावा लागेल. आगामी काळात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळेल. यातील चार सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे.
सध्या ऑस्ट्रेलियन संघ आपल्या मायदेशात पाकिस्तानविरुद्ध वन डे मालिका खेळत आहे. यजमानांनी पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली. या मालिकेनंतर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाईल. भारताविरुद्धची मालिका लक्षात घेऊन क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या काही खेळाडूंना पाकिस्तान मालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये कर्णधार पॅट कमिन्सचा समावेश होता. कमिन्सशिवाय मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड, मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ हे पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात आणि त्यानंतरच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळणार नाहीत.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर.