मेलबर्न: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून दोन्ही संघातील वनडे मालिकेची आजच सांगता झाली. कोरोना लॉकडाऊनंतर ऑस्ट्रेलियात प्रथमच आंतरारष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियातील वाहिनी चॅनल सेव्हनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाविरोधात न्यायालयात धाव घेतली शिवाय ऑस्ट्रेलिया क्रिकेड बोर्ड बीसीसीआयला घाबरत असल्याचा आरोप केला .
बीसीसीआय आणि अन्य प्रसारणाचे करार असलेली फॉक्सटेल यांच्या मर्जीनुसार सर्वकाही सुरू आहे. या दौऱ्याच्या कार्यक्रमाला अंतिम रूप देताना सीए, बीसीसीआय, फॉक्सटेल आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये ई-मेल द्वारे झालेले संभाषण आपल्याला पाहायचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळेही चॅनल सेव्हनला मोठे नुकसान सोसावे लागल्याचे म्हटले जात आहे. चॅनल सेव्हनला चार कसोटी सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क आहेत तर फॉक्स स्पोर्ट्सला एकदिवसीय आणि टी-२० मालिकांचे हक्क देण्यात आले आहेत. दरम्यान, या दोन्ही मालिकांमध्ये विराट कोहली खेळणार आहे. परंतु कसोटी सामन्यामधील एकच सामन्यामध्ये विराट खेळणार आहे. दरम्यान दोन्ही चॅनलने विराटवरच आपले प्रोमो तयार केले होते. परंतु विराटच्या मॅटरनिटी लिव्हमुळे चॅनल सेव्हनला नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
‘सिडनी मॉर्निंग हेराॅल्ड’च्या वृत्तानुसार चॅनल सेव्हनने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बीसीसीआयच्या सोयीनुसार मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून हे प्रसारण कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.‘ ऑस्ट्रेलियाला भारताविरोधात एकदिवसीय आणि टी २० सामन्यांऐवजी दिवस रात्र कसोटी सामन्यासह कसोटी मालिकेचे आयोजन करायचे होते तथापि कसोटी सामने १७ डिसेंबरपासून खेळवले जाणार आहेत. हे अतिशय दुर्दैवी असून आणि ऑस्ट्रेलियातील मालिकेचे प्रसारक म्हणून आमच्या सन्मान केला जात नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड बीसीसीआयला घाबरते,’ असा आरोप सेव्हन वेस्ट मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स वॉरबर्टन यांनी केला.