Cricket Australia’s stand upset IPL Teams - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला २६ किंवा २७ मार्चपासून सुरूवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन नव्या फ्रँचायझी दाखल झाल्यामुळे आता विजयी चषकासाठी १० संघांमध्ये चुरस पाहायला मिळेल. पण, ज्या फ्रँचायझींच्या ताफ्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत, त्यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ४ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत ३ कसोटी, ३ वन डे आणि १ ट्वेंटी-२० सामन्यांसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे, परंतु त्यांच्या एका निर्णयामुळे आयपीएल फ्रँचायझींना फटका बसणार आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यावरील मर्यादित षटकांच्या मालिकेत पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, जोश हेझलवूड, ग्लेन मॅक्सवेल यांचा संघात समावेश केलेला नाही, परंतु असे असले तरी या खेळाडूंना ६ एप्रिलपर्यंत आयपीएल २०२२ मध्ये सहभाग घेता येणार नसल्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आयपीएल फ्रँचायझी नाराज झाले असून ते हा मुद्दा बीसीसीआयसमोर मांडणार आहेत.
''हा चुकीचा निर्णय आहे. हे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या संघाचा भाग असते तर आम्ही समजू शकलो असतो, परंतु या दौऱ्यावर त्यांची निवड झालेली नाही. मग त्यांना सुरुवातीपासून आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी न देण्यात काहीच अर्थ नाही,''असे एका फ्रँचायझीने सांगितले. CA च्या नियमानुसार राष्ट्रीय संघाचा दौरा सुरू असताना करारबद्ध खेळाडू संघात नसले तरी जो पर्यंत दौरा आहे तोपर्यंत त्यांना अन्य फ्रँचायझी लीगमध्ये खेळता येणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा ५ एप्रिलला संपणार आहे आणि त्यानंतरच या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभाग घेता येणार आहे.
''या खेळाडूंना ६ एप्रिलला रिलीज करण्याचा अर्थ त्यांना कोरोना नियमांचे पालन करावे लागेल आणि त्यानंतर ११ किंवा १२ एप्रिलपासून ते खेळण्यास उपलब्ध होतील. याचा अर्थ ते ३-४ सामन्यांना मुकणार. यासंदर्भात बीसीसीआयची चर्चा करणार आहे,''असेही फ्रँचायझीने सांगितले.
- पॅट कमिन्स - कोलकाता नाइट रायडर्स ( ७.२५ कोटी)
- मिचेल मार्श - दिल्ली कॅपिटल्स ( ६.५० कोटी)
- डेव्हिड वॉर्नर - दिल्ली कॅपिटल्स ( ६.२५ कोटी)
- डॅनिएल सॅम्स - मुंबई इंडियन्स ( २.६ कोटी)
- मॅथ्यू बेड - गुजरात टायटन्स ( २.४ कोटी)
- सिन अबॉट - सनरायझर्स हैदराबाद ( २.४ कोटी)
- नॅथन कोल्टर-नायल - राजस्थान रॉयल्स ( २ कोटी)
- रिले मेरेडिथ - मुंबई इंडियन्स ( १ कोटी)
- नॅथन एलिस - पंजाब किंग्स ( ७५ लाख)
- जेसन बेहरेनडॉर्फ - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( ७५ लाख)
- ग्लेन मॅक्सवेल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- रिटेन ( १४ कोटी)
- मार्कस स्टॉयनिस - लखनौ सुपर जायंट्स