नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे गोलंदाज चेंडूला चकाकी आणण्यासाठी यापुढे लाळेचा वापर करू शकणार नाहीत. लाळेऐवजी एखाद्या कृत्रिम पदार्थाच्या वापराची परवानगी देण्याचा विचार होऊ शकतो. दुसऱ्या शब्दात याला ‘चेंडूची छेड’ काढण्याचा प्रकारदेखील म्हणू शकतो.‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार पंचांच्या देखरेखीत चेंडूला चकाकी आणण्यासाठी कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यास गोलंदाजांना परवानगी बहाल करण्याचा प्रशासक विचार करीत आहेत. आयसीसीची गुरुवारी ‘ऑनलाईन’ बैठक पार पडली. बैठकीनंतर वैद्यकीय समिती प्रमुख पीटर हारकोर्ड यांनी बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘आमचे पुढील लक्ष्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करण्याचा ‘रोडमॅप’ तयार करणे हे असेल. यासाठी काय उपाय योजावे लागतील ते पाहावे लागेल. त्यात खेळाडूंच्या तयारीपासून सरकारचे निर्बंध आणि दिशानिर्देशांचा समावेश आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने चेंडूवर लाळेचा वापर न करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. ‘खेळ सुरू होताच काही वेळासाठी वेगवान गोलंदाजांना केवळ घामाचा वापर करू द्यावा. अखेर खेळाडूंचे आरोग्य सर्वतोपरी आहे,’ असे व्यंकटेशचे मत होते.(वृत्तसंस्था)हा चेंडूची छेड काढण्याचाच प्रकारचेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा घामाऐवजी अन्य कुठल्या वस्तूचा वापर करणे, आयसीसी नियमानुसार चेंडू छेडण्याचाच प्रकार ठरतो. कसोटी क्रिकेटमध्ये चेंडूला चमक असणे महत्त्वपूर्ण ठरते. यामुळे गोलंदाज स्विंग किंवा रिव्हर्स स्विंग सहजपणे करू शकतो. कृत्रिम पदार्थाचा चेंडूवर वापर करण्याची परवानगी मिळाल्यास खेळाची थट्टा ठरेल. २०१८ ला द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यादरम्यान चेंडूवर चकाकी आणण्यासाठी अज्ञात पदार्थाचा वापर केल्याच्या आरोपात दोषी ठरलेले आॅस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना वर्षभराच्या बंदीची शिक्षा भोगावी लागली होती.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- CoronaVirus: चेंडूला चकाकीसाठी कृत्रिम पदार्थाचा वापर- आयसीसी
CoronaVirus: चेंडूला चकाकीसाठी कृत्रिम पदार्थाचा वापर- आयसीसी
लाळेऐवजी अन्य पदार्थाला वैध करण्याचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 2:30 AM