भारतीय क्रिकेट संघात कर्णधारपदावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव नाही. टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने स्वत:च या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते. मात्र, यानंतर बीसीसीआयने त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरूनही काढले. यामुळे हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे, पण आता प्रश्न असाही उपस्थित होत आहे, की विराट कोहलीसारखा मोठा खेळाडू आणि जबरदस्त रेकॉर्ड असलेल्या कर्णधारासोबत BCCI ने योग्य केले?
क्रिकेट स्तंभलेखक अयाज मेमन इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले, 'गेल्या 10-15 दिवसांत ज्या काही घडामोडी होत आहेत, त्या भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने खूप मोठ्या आहेत. पण हा वाद का झाला? हे सर्व त्या प्रेस रिलीजमुळे झाले, ज्यामध्ये विराट कोहलीला कर्णधार पदावरून काढून टाकल्याचे सांगण्यात आले.
मेमन पुढे म्हणाले, 'या माणसाने आपल्या क्रिकेटसाठी खूप काही केले. आपण एक थँक्यूसुद्धा म्हटले नाही. एवढ्या मोठ्या खेळाडूला कर्णधारपदावरून काढताना आपण केवळ एक प्रेस रिलीझ देत आहात. मेमन म्हणाले, विराट कोहलीला T20 च्या कर्णधार पदावर राहायचे नाही, असे विधान सौरव गांगुलीने केले होते, पण जर विराट हो म्हणाला असता, तर काय रोहित शर्मा कर्णधार झाला नसता.’
प्रसिद्धीपत्रात होता विराटला कर्णधारपदावरून हटवल्याचा उल्लेख -जेव्हा बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली होती, त्याचवेळी आता रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार असेल, अशी माहितीही दिली होती. एवढेच नाही, तर या प्रेस रिलीजच्या एका दिवसानंतर, बीसीसीआयने आपल्या सोशल मीडियावर विराट कोहलीचे आभार मानण्यासही सुरुवात केली आणि विराट कोहलीसंदर्भात अनेक ट्विट देखील केले होते.