Join us

...अखेर क्रिकेटची सरशी झाली

रॉबिन उथप्पा : दोन वर्षे नैराश्याच्या गर्तेत सापडलो होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 04:58 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताच्या २००७ टी-२० विश्वकप विजेता संघाचा महत्त्वाचा सदस्य राहिलेल्या रॉबिन उथप्पाने सांगितले की आपल्या कारकिर्दीत त्याने दोन वर्षांपर्यंत नैराश्य व आत्महत्येच्या विचारांसोबत संघर्ष केला असून त्यावेळी केवळ क्रिकेट हे एकमेव कारण होते की ज्यामुळे त्याला बाल्कनीमधून उडी मारण्यापासून रोखले.

भारतातर्फे ४६ वन-डे आणि १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या उथप्पाला यंदा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सने तीन कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. कोरोना व्हायरस महामारीमुळे आयपीएल स्थगित करण्यात आले. राजस्थान रॉयल्सचे लाईव्ह सत्र ‘मार्इंड, बॉडी अ‍ॅण्ड सोल’मध्ये बोलताना उथप्पा म्हणाला, ‘माझ्या आठवणीनुसार २००९ ते २०११ दरम्यानच्या कालावधीत हे सातत्याने घडत होते. मी रोज अशा अवस्थेला सामोरे जात होतो. मी त्यावेळी क्रिकेटबाबत विचारही करीत नव्हतो.

आज कसा असेल आणि उद्याचा दिवस कसा राहील, माझ्या जीवनात काय होईल आणि मी कुठल्या दिशेला आगेकूच करीत आहे, अशा विचारांचे काहूर माझ्या डोक्यात माजले होते. क्रिकेटमुळे माझ्या मनातून या सर्व बाबी बाहेर पडल्या. सामना नसेल त्या दिवशी व आॅफ सीजनमध्ये मोठी अडचण येत होती.’