Join us  

ऑलिम्पिक पात्रतेसाठी क्रिकेट संघांना पार करावा लागेल हा अडथळा, केवळ याच संघांना मिळणार संधी

Cricket in Olympics 2028: जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकमध्ये तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मंगळवारी मुंबईत झालेल्या मतदानानंतर क्रिकेटचा ऑलिम्पिक खेळांमध्ये समावेश करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:26 AM

Open in App

जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकमध्ये तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटचं पुनरागमन होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मंगळवारी मुंबईत झालेल्या मतदानानंतर क्रिकेटचा ऑलिम्पिक खेळांमध्ये समावेश करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. २०२८ मध्ये लॉस एंजिलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने खेळले जाणार आहेत. ऑलिम्पिकच्या इतिहासाचा विचार केल्यास आतापर्यंत केवळ एकदाच क्रिकेटचा या स्पर्धेत समावेश झाला होता. तेव्हा पुरुष विभागातीलच सामने झाले होते. तसेच त्यात केवळ दोन संघच सहभागी झाले होते. तेव्हा ब्रिटनच्या संघाने फ्रान्सला पराभूत करून सुवर्णपदक जिंकले होते.

२०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या संघांबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आयसीसीने दिलेल्या प्रस्तावानुसार आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या सहा क्रमांकावर असलेल्या संघांनाच ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी क्रिकेट संघांना निर्धारित कालावधीमध्ये पहिल्या सहा संघांमध्ये आपलं स्थान राखावं लागणार आहे.

आयसीसी २०२८ च्या ऑलिम्पिकसाटी रँकिंगचा एक कट ऑफ टाइम निर्धारित करणार आहे. त्या आधारावर ऑलिम्पिक खेळणाऱ्या सहा संघांची नावं निश्चित होतील. सध्याची टी-२० क्रमवारी पाहिल्यास भारताचे पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकतात. दुसरीकडे हीच क्रमावारी कायम राहिल्यास पाकिस्तानच्या महिला संघाला संधी मिळू शकणार नाही.

सध्याच्या पुरुष क्रमवारीचा विचार केल्यास भारत पहिल्या, इंग्लंड दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, पाकिस्तान चौथ्या, ऑस्ट्रेलिया पाचव्या आणि दक्षिण आफ्रिका सहाव्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाला ऑलिम्पिकमध्ये खेळता येणार नाही. कारण ते सध्या या क्रमावारीत सातव्या क्रमांकावर आहेत.

महिला टी-२० क्रमवारीचा विचार केल्यास ऑस्ट्रेलिया पहिल्या, इंग्लंड दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, भारत चौथ्या, दक्षिण आफ्रिका पाचव्या आणि वेस्ट इंडिज सहाव्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत पाकिस्तान आठव्या क्रमांकावर आहे.  पुरुष आणि महिला क्रमवारीचा विचार केल्यास श्रीलंकेचे दोन्ही संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार नाहीत.

दरम्यान, आयओसीचे स्पोर्ट्स डायरेक्टर किट मेकेनॉन यांनी सांगितले की, पात्रतेच्या निकषांवर अंतिम निर्णय हा २०२५ मध्ये घेतला जाईल. सर्वसाधारणपणे सांघिक खेळांमध्ये एक यजमान संघ उतरतो. मात्र आम्ही जागतिक आणि प्रादेशिक संतुलनाचा विचार करतो. त्यामुळे आम्ही त्याच आधारावर कुठलाही निर्णय घेऊ, यजमान देशाचा विचार केल्यास ऑलिम्पिक अमेरिकेत होणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये अमेरिका सध्या आयसीसीची असोसिएट्स सदस्य आहे. पुरुष क्रमवारीचा विचार केल्यास पुरुष क्रमवारीमध्ये हा संघ सध्या २२ व्या क्रमांकावर आहे.  

टॅग्स :आयसीसीआंतरराष्ट्रीय क्रिकेटअमेरिका