नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू पुढील वर्षी होणाऱ्या मालिकेत एकाच संघातून खेळताना दिसतील. २०२३ च्या आयपीएल आयोजनानंतर आशिया एकादश आणि आफ्रिका एकादश यांच्यात मालिका खेळविली जाणार आहे. आशिया एकादशमध्ये श्रीलंका आणि बांगला देशच्या खेळाडूंचा देखील समावेश असेल. भारत-पाकमध्ये सध्यातरी कुठल्याही द्विपक्षीय मालिकेचे आयोजन होताना दिसत नाही. दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी नाही.
टी-२० प्रकारात आयोजन२०२३ च्या मालिकेचा फॉर्मेट टी-२० हा असेल. याआधी वन डे प्रकारात सामने झाले होते. यासंदर्भात बीसीसीआय सचिव जय शाह आणि आफ्रिका क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सुमोद दामोदर यांच्यात पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये आयसीसी बोर्डच्या बैठकीत चर्चा होईल. या मालिकेत दिग्गजांचा भरणा असावा, असा प्रयत्न केला जात आहे. प्रायोजक आणि प्रसारणकर्ते यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. आशिया क्रिकेटचे पॉवर हाऊस असल्याने आयोजनाचा आफ्रिका क्रिकेटला लाभ होणार असल्याची आशा दामोदर यांनी व्यक्त केली.