सौराष्ट्राचे क्रिकेटर दिल्लीच्या कोटलापासून केरळपर्यंत आपल्या खेळाने सर्वांना चकीत करत आले आहेत. परंतू सध्या तेथील संघांना एक वेगळ्याच टेन्शनने ग्रासले आहे. गेल्या २० दिवसांत राजकोटच्या चौथ्या क्रिकेटरचा खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
राजकोटमध्ये गेल्या 20 दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने चार तरुण खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. तर, गुजरातच्या सुरतमध्येही एका तरुणाच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळून हा तरुण घरी परतला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या तरुणाचे नाव प्रशांत असे आहे.
१९ फेब्रुवारीला राजकोटमध्ये क्रिकेट खेळत असताना एका तरुणाला हार्ट अॅटॅक आल्याने मृत्यू झाला आहे. रेस कोर्स मैदानात क्रिकेट खेळताना जिग्नेश चौहान याने ३० रन्स बनविले होते. आऊट झाल्यानंतर तो खुर्चीवर बसला होता, यावेळी त्याला अचानक झटका आला. त्याला तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. जिग्नेश चौहान याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. त्यानंतर त्यानेज कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती. जिग्नेशला २ वर्षांची मुलगीही आहे.
त्यापूर्वी काही दिवसांपूर्वी सुरतचा रहिवासी प्रशांत कांतीभाई भरोलिया क्रिकेट सामना खेळून घरी परतला होता. घरी आल्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जिथे उपचारादरम्यान प्रशांतचा मृत्यू झाला. यापूर्वी ३० जानेवारीला दोन वेगवेगळ्या घटनांत दोन खेळाडूंचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १५ फेब्रुवारीला एकाचा मृत्यू झाला होता.