नवी दिल्ली: महान धावपटू उसेन बोल्ट याला वडिलांकडूनच क्रिकेटची आवड वारशात मिळाली आहे. त्यामुळेच क्रिकेट माझ्या रक्तातच आहे आणि टी-२० हे परिपूर्ण स्वरूप आहे, असे बोल्टने म्हटले आहे.
तब्बल आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या बोल्टला जमैकात बालपणी वेगवान गोलंदाज व्हायचे होते. पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषकाचा राजदूत असलेल्या बोल्टला काही कारणांमुळे गोलंदाज होण्याचे स्वप्न साकारता आले नाही.
बोल्ट म्हणाला की, मी क्रिकेट पाहतच मोठा झालो आहे. माझे वडील क्रिकेटचे शौकीन होते आणि आजही आहेत. क्रिकेट माझ्या रक्तातच आहे. मी राजदूत म्हणून क्रिकेटशी जोडला जात आहे आणि ते शानदार आहे. क्रिकेटपटू होण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले नाही; पण टी-२० विश्वचषकाचा राजदूत होणे माझ्यासाठी विशेष आहे.
सात वर्षांच्या कारकिर्दीत १०० आणि २०० मीटरमध्ये विश्वविक्रम करणाऱ्या बोल्टने अनेकदा यश मिळवले आहे. गेल्या काही महिन्यांत संगीत आणि फुटबॉलची आवड पूर्ण करण्यासाठी जगभरात फिरणाऱ्या बोल्टला टीव्हीवर क्रिकेट आणि आयपीएल पाहण्याची संधी मिळाली नाही.
तो म्हणाला की, मी अधिक प्रमाणात क्रिकेट पाहू शकलो नाही. पण, जेव्हा संधी मिळते, तेव्हा टी-२० सामना पाहतो. क्रिकेटचे हे प्रारूप मला अधिक आवडते. यामध्ये तुम्हाला बळकट, वेगवान आणि चांगली रणनीती तयार करण्यात तज्ज्ञ असावे लागते. यामध्ये कसोटी आणि वनडे दोन्हींची जादू पाहायला मिळते.
वेस्ट इंडीजमध्ये टी-२० आणि वनडे आताही लोकप्रिय आहे. लोकांना कसोटी क्रिकेट फारसे आवडत नाही. टी-२० हा प्रकार खेळाच्या वेगाशी जोडलेला आहे. आंद्रे रसेलसारख्या फटकेबाजाला पाहताना मजा येते.
सचिन, ब्रायन बालपणीच्या आठवणींचा भाग
बोल्ट म्हणाला की, लहानपणी मला वसीम अक्रम खूप आवडायचा. त्यामागे त्याचा इनस्विंग यॉर्कर हे कारण होते. कर्टनी वॉल्श, कर्टली एम्बरोज यांचाही मी चाहता होतो. वडिलांप्रमाणे मी वेस्ट इंडीजचा समर्थक होतो; पण मला सचिन तेंडुलकर आवडतो. सचिन आणि ब्रायन लारा हे माझ्या बालपणीच्या आठवर्णीचा भाग आहेत. सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीसारखा कोणी नाही, असेही तो म्हणाला.