नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचे एन्ट्री झाल्यानंतर आता क्रिकेटचा थरार ऑलिम्पिकमध्ये देखील रंगणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) क्रिकेटसह इतर आठ खेळांचा ऑलिम्पिक २०२८ मध्ये समावेश करण्याबद्दल विचार करत आहे. २०२८ ऑलिम्पिक स्पर्धेचा थरार लॉस एंजेलिसमध्ये पार पडणार आहे. २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आयोजन समितीने आयसीसीला आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे. क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होणार का याचा अंतिम निर्णय २०२३ मध्ये होणार आहे. विशेष म्हणजे आयसीसी आणि इंग्लंड बोर्डाच्या विशेष प्रयत्नामुळे क्रिकेटचा राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
२०२८ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटशिवाय अन्य ८ खेळांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे. बेसबॉल, फ्लॅग फुटबॉल, ब्रेक डांन्सिग, कराटे, किकबॉक्सिंग, स्क्वॉश, लॅक्रोस आणि मोटरस्पोर्ट अशा खेळांचा समावेश होऊ शकतो. ऑलिम्पिक समितीने फेब्रुवारीमध्ये सांगितले होते की, २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण २८ खेळांचा समावेश असेल, ज्याचा मुख्य उद्देश्य युवा खेळाडूंना संधी देणे असेल. मात्र नवीन खेळ ऑलिम्पिकच्या नियमांमध्ये बसतात का हे पाहावे लागेल असे समितीने म्हटले होते.
राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटची भरपूर क्रेझआयसीसीच्या म्हणण्यानुसार क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये करणे आवश्यक आहे. आयसीसीचे सीईओ ज्योफ ॲलार्डिस यांनी म्हटले, "राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटला खूप लोकप्रियता मिळत आहे आणि क्रिकेटचे सर्वाधिक आकर्षण राहिले आहे. मोठ्या मंचावर खेळणे खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासारखे आहे." सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये केवळ महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी ऑलिम्पिकमध्ये महिला आणि पुरूष दोन्ही क्रिकेटचा समावेश होण्याची आशा आहे. क्रिकेटचे जागतिक पातळीवर जाळे वाढत असल्याचा आयसीसीला पूर्ण विश्वास आहे.