IND vs SL 2nd T20: भारतीय संघाचा नवा अध्याय श्रीलंकेत सुरु झाला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) यांची ही पहिलीच परीक्षा आहे. या मालिकेत भारताने रविवारी दुसरा टी२० सामना जिंकून मालिका जिंकली. ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिले दोनही सामने भारताने ( Team India ) जिंकले. दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंकेने ( Sri Lanka ) प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १६१ धावा केल्या. पण भारताची फलंदाजी सुरु असताना पाऊस आल्याने टीम इंडियाला DLS पद्धतीने ८ षटकांत ७८ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. हे आव्हान भारतीय संघाने ६.३ षटकांत पूर्ण केले आणि मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर ( Pakistani Cricketer ) बासित अली याने एका स्टार खेळाडूवर खोचक शब्दांत टीका केली.
पाकिस्तानी माजी क्रिकेटर काय म्हणाला?
"अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू, वानिंदू हसरंगा (श्रीलंकेचा माजी कर्णधार). मला वाटतं तो स्वत:ला क्रिकेट या खेळापेक्षाही मोठा मानत आहे. क्रिकेट छोटी गोष्ट आहे, तो त्यापेक्षा मोठा आहे. (दुसऱ्या टी२० मध्ये) तो पहिल्याच चेंडूवर खराब फटका खेळून बाद झाला. गोलंदाजीतही त्याची सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने धुलाई केली. माझ्या मते सामनावीराचे बक्षीस हसरंगाला द्यायला हवं होतं. त्याला 'मॅन ऑफ द मॅच' द्या आणि तिसऱ्या सामन्यात संघाबाहेर बसवा. तो खराब फटके खेळतो आणि गोलंदाजीतही खूप महागडा ठरतोय. तो स्वत:ला बुमराह समजायला लागला आहे असं दिसतंय. रवी बिश्नोईकडून त्याने शिकायला हवं," अशा रोखठोक शब्दांत बासित अली यांनी हसरंगाला सुनावलं.
दरम्यान, दुसऱ्या सामन्यात रवी बिश्नोईला सामनावीराचा किताब मिळाला. त्याने २६ धावांत ३ बळी टिपले. तर वानिंदू हसरंगाने केवळ २ षटकांमध्ये ३४ धावा दिल्या आणि १ बळी टिपला. पहिल्या सामन्यातदेखील हसरंगाला १ बळीच टिपता आला होता. त्या सामन्यात त्याने ४ षटकांत २८ धावा दिल्या होत्या. आता भारताने मालिकेत २-०ची अजिंक्य आघाडी घेतली असून मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ३० जुलैला संध्याकाळी ७ वाजता पल्लेकलेच्या मैदानावर रंगणार आहे.