दुबई : पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका रद्द झाल्यामुळे भारताचा महिला संघ २०२१ च्या आयसीसी वन डे विश्वचषकासाठी पात्र ठरला. पाकविरुद्ध खेळण्याची भारत सरकारने संघाला परवानगी नाकारली होती. आयसीसीने याबद्दल बुधवारी अधिकृत घोषणा केली आहे. भारतीय महिलांसह यजमान न्यूझीलंड, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. ६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२१ रोजी न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
आयसीसीच्या तांत्रिक समितीची बैठक नुकतीच पार पडली, ज्यामध्ये आयसीसी महिला चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेल्या संघांना समान गुण देण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला. २०१७ साली भारतीय महिला संघ अंतिम फेरीत पोहचला होता. २०१७ ते २०२० या काळात आयसीसी महिला चॅम्पियनशिपमधील २१ सामन्यांपैकी भारतीय महिलांनी १० सामने जिंकले तर ८ सामने गमावले. नोव्हेंबर २०१९ साली मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला अखेरचा वन-डे सामना खेळल्या होत्या. पिछाडीवर पडलेल्या भारतीय महिलांनी दमदार पुनरागमन करत विंडीजवर मात करून मालिका २-१ ने जिंकली होती.आॅस्ट्रेलिया ३७ गुणांसह अव्वल, इंग्लंड २९ गुणांसह दुसऱ्या, द. आफ्रिका २५ गुणांसह तिसºया तर भारत २३ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. न्यूझीलंड संघाला स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आला.उर्वरित संघांना पात्रता फेरी खेळून मुख्य स्पर्धेसाठी पात्र व्हावे लागणार आहे. (वृत्तसंस्था)