Cricket News: क्रिकेटच्या मैदानातून दररोज काही ना काही आश्चर्यकारक घटना समोर येत असतात. सध्या, एक क्रिकेट सामना चर्चेत आहे कारण तो खूपच लवकर संपला. प्रथम एका संघाने पाच षटके फलंदाजी करत दुसऱ्या संघाला विजयासाठी केवळ २१ धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने अवघ्या ९ चेंडूत सामना जिंकत पराक्रम केला. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरच सामन्याचा निकाल लागला. हे कुठे आणि कोणत्या सामन्यात घडले ते जाणून घेऊया.
५-५ षटकांचा सामना
नेपाळमधील पंतप्रधान चषक महिला राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा 2025 ही T-20 स्वरूपात खेळवली जात आहे. पण सुदूर पश्चिम प्रांत महिला आणि कर्नाली प्रांत महिला क्रिकेट संघ यांच्यातील सामना प्रत्येकी फक्त पाच षटकांचा खेळला गेला. खराब वातावरणामुळे दोन्ही संघ प्रत्येकी पाच षटकेच खेळणार हे निश्चित झाले. हा सामना नेपाळमधील फाप्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला गेला. यामध्ये कर्णाली महिला संघाने प्रथम फलंदाजी केली. पण त्यांना फारशी चमक दाखवली नसल्याने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
सुदूर महिला संघाने ९ चेंडूत जिंकला सामना
सुदूर महिला संघाने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय योग्य ठरला. प्रथम गोलंदाजी करताना सुदूरने कर्णालीला केवळ २० धावाच करू दिल्या. कर्णालीने ५ षटकांत ७ गडी गमावले आणि फक्त एक चौकार मारला. ७ पैकी ४ फलंदाज खातेही उघडू शकले नाहीत. कर्नालीच्या डावात फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या केवळ ८ धावा होती. श्रुती बुद्धाने ही खेळी केली तर रामा बुधाथोकीने ६ धावा केल्या. अंजू गुरुंग दोन धावांवर बाद झाली. सोविका शाही, दीक्षा पुरी, गौरी बोहरा आणि बीना थापा या चारही फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. यापैकी दीक्षा आणि बीना हे दोन फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतल्या.
कबिता-आशिकाने गोलंदाजीत धुमाकूळ घातला
या सामन्यात कविता कुंवर आणि आशिका महारा यांनी आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला. कबिताने २ षटकांत १ मेडनसह केवळ एक धाव देत दोन गडी बाद केले. आशिकाने दोन षटकांत १२ धावा देत तीन बळी घेतले. रितू कनोजियाला एक विकेट मिळाली. गोलंदाजीनंतर कबिताने फलंदाजी करताना ६ चेंडूत १४ धावा केल्या तर मनीषा बोहराने ५ धावांचे योगदान दिले. २१ धावांचे लक्ष्य सुदूर संघाने १.३ षटकांत पूर्ण केले.