भारतीय व्यावसायिकावर मॅच फिक्सिंगसाठी भाग पाडल्याचा आरोप करणारा झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रेंडन टेलर याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ने साडेतीन वर्षांची बंदी घातली. ICC ने शुक्रवारी ही घोषणा केली. टेलरने भ्रष्टाचारात आपला सहभाग असल्याची कबुली दिली असून ICC अँटी करप्शन कोडच्या चार नियमांचे आणि ICC अँटी-डोपिंग कोडच्या एका नियमाचे त्याने उल्लंघन केले. ICC च्या टीमने केलेल्या चौकशी व तपासात तो दोषी आढळला असल्याने आता त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये साडेतीन वर्षांसाठी बंदी घातली आहे.
टेलरने २००४ ते २०२१ या कालावधी दरम्यान २८४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले. त्याने एकूण १७ शतकांसह ९ हजार ९३८ धावा केल्या. गेल्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. टेलरच्या बंदीबाबत आयसीसीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की टेलरला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती, पण तो त्यात अपयशी ठरला. त्याने कथित भ्रष्ट व्यक्तींकडून भेटवस्तू आणि रोख रक्कम स्वीकारल्याचे मान्य केले. श्रीलंका आणि बांग्लादेश विरुद्ध झिम्बाब्वेच्या आगामी मालिकेत फिक्सिंग व भ्रष्टाचार होणार असल्याची माहिती ICC ला देण्यात तो असमर्थ ठरला असाही एक आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर साडेतीन वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय व्यावसायिकावर टेलरने केले होते आरोप
ऑक्टोबर २०१९ मध्ये मला एका भारतीय व्यावसायिकाने संपर्क केला. त्याने मला स्पॉन्सरशीपबद्दल चर्चा करण्याबाबत विचारलं. भारतात येण्यासाठी १५ हजार डॉलर्स देण्यात आले. झिम्बाब्वे बोर्डाकडून ६ महिन्यांपासून पैसे मिळाले नव्हते त्यामुळे मी भारतात गेलो. तेथे मी त्या व्यावसायिकासोबत डिनर केलं. मला डिनरसोबतच कोकेन ड्रग्सही देण्यात आलं. आणि दुसऱ्या दिवशी तोच ड्रग्स सेवनाचा व्हिडीओ दाखवून मला ब्लॅकमेल करण्यात आलं. त्यानंतर मला आंतरराष्ट्रीय सामन्यात स्पॉट फिक्सिंग करण्याची धमकी मिळाली. काम झाल्यावर २० हजार डॉलर्स मिळतील असंही मला सांगितलं गेलं. मला माझा जीव वाचवायचा होता, त्यामुळे मी ते पैसे घेतले आणि निघून आलो. पण मी फिक्सिंग केलं नाही. चार महिने त्या व्यावसायिकाने मला त्रास दिला. अखेर मी ICC ला याबद्दल माहिती दिली, असं ब्रेंडन टेलरे आपल्या पत्रकात नमूद केलं होतं.