- अयाझ मेमन
(कन्सल्टिंग एडिटर, लोकमत)
सामन्यात सर्वात मोठा प्रसंग घडला तो समालोचन कक्षामध्ये. वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मायकल होल्डिंग यांनी सहकारी समालोचक आणि इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैन याच्यासह थेट समालोचन करत असताना वर्णभेदाविरुद्ध भाष्य केले. शिवाय दोन्ही संघांतील खेळाडूंनी काही क्षणांसाठी गुडघे टेकवून वर्णभेदाचा निषेध केला. समाजामध्ये किंवा खेळांमध्ये कोणतेही बदल निश्चय, धैर्य आणि आत्मविश्वासाशिवाय होऊ शकत नाहीत, असा संदेश यावेळी क्रिकेट मैदानातून देण्यात आला. याशिवाय इंग्लंडची माजी महिला कर्णधार इबोनी रेनफोर्ड-ब्रेंट हिनेही वर्णभेदाविरुद्ध निषेध करत जगासमोर आपले मत मांडले.
सा ऊदम्पटन येथे इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट सामन्याला झालेल्या सुरुवातीमुळे तब्बल चार महिन्यानी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थरार अनुभवता आला. क्रिकेटप्रेमींमध्येही सहाजिकच याबाबत उत्सुकता होती. त्याचप्रमाणे कोरोनामुळे सध्या जे काही नवे नियम आणले गेलेत, त्यानुसार खेळ कसा होणार याकडेही सर्वांचे लक्ष होते. स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच याने आयोजित केलेली अॅड्रिया टूर स्पर्धा दुर्दैवाने कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने झटपट गुंडाळण्यात आली. या प्रसंगामुळे संपूर्ण क्रीडाविश्वाला धोक्याचा संकेत मिळाला होता.
परंतु सुदैवाने सध्या तरी इंग्लंडमध्ये असा कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. नक्कीच प्रेक्षकांविना खेळविण्यात येत असलेल्या या सामन्यात रिकामे स्टेडियम पाहून दु:ख होत आहे. पण त्याच वेळी कोरोनामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर किंवा त्यांच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. सामन्यादरम्यान अनेकदा नव्या नियमांची अंमलबजावणी दिसून आली. उदा., बळी घेतल्यानंतर टाळ्या न वाजवणे, हस्तांदोलन न करणे किंवा मिठी न मारणे. थोडक्यात, यावेळी खेळाडूंनी शारीरिक संपर्क पूर्णपणे टाळण्यावर भर दिल्याचे दिसून आले. त्याच वेळी, चेंडूवर लाळ न लावण्याचे सूचित करण्यात आले असल्याने क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांसाठी या नियमाचे पालन करणे सहजसोपे नव्हते. असे असले तरी दोन्ही संघांतील खेळाडूंची देहबोली सकारात्मक होती. आतापर्यंतच्याखेळातून उच्च दर्जाचे क्रिकेट पाहण्यास मिळाले. बॅट आणि चेंडूतील स्पर्धा आतापर्यंत अत्यंत अटीतटीची रंगली. विंडीज संघाने शानदार खेळ केला. इंग्लंडची फलंदाजी कमजोर भासली. परिस्थिती यजमान देशासाठी सकारात्मक होती. तरीही विंडीजने त्यांना २०४ धावांमध्ये गारद केले. गोलंदाजीमध्ये सर्वात प्रभावी ठरला तो, कर्णधार जेसन होल्डर.
यानंतर विंडीजने फलंदाजीतही आणखी दमदार खेळ केला असता, तर त्यांना पूर्ण पकड मिळवता आली असती.
मधल्या फळीने आणखी थोडा वेळ तग धरला असता, तर ५०-६० धावांचा फायदा झाला असता.
११४ धावांची आघाडी घेत विंडीजने इंग्लंडला बॅकफूटवर टाकले आहे. आता अखेरच्या दोन दिवसाच्या खेळावर सर्वांची नजर आहे. काही नाट्यमय घडामोडी आणि सामना निकाली झाल्यास कसोटी क्रिकेटचे यशस्वी पुनरागमन होईल.
Web Title: cricket match in four months!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.