स्वित्झर्लंडमध्ये गोठलेल्या तलावावर रंगला क्रिकेटचा सामना; सेहवागने आफ्रिदीच्या संघाला चोपले

हिरवळीवर खेळायची सवय असलेले हे खेळाडू या सामन्यात बर्फावरून अनेकदा घसरताना दिसले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 09:15 AM2018-02-09T09:15:50+5:302018-02-09T09:15:59+5:30

whatsapp join usJoin us
Cricket match on Lake Liverpool in Switzerland; Sehwag got rid of Afridi's team | स्वित्झर्लंडमध्ये गोठलेल्या तलावावर रंगला क्रिकेटचा सामना; सेहवागने आफ्रिदीच्या संघाला चोपले

स्वित्झर्लंडमध्ये गोठलेल्या तलावावर रंगला क्रिकेटचा सामना; सेहवागने आफ्रिदीच्या संघाला चोपले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बर्न: स्वित्झर्लंडमधील आल्प्स पर्वतरांगाच्या कुशीत आयोजित करण्यात आलेल्या Ice Cricket 2018 मध्ये  गुरुवारी भारत आणि पाकिस्तान या क्रिकेटमधील पारंपारिक द्वंद्वाचा थरार अनुभवायला मिळाला. येथील एका रिसॉर्टमधील बर्फाळ मैदानात ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि पाकिस्तानचा धडाकेबाज खेळाडू शाहीद आफ्रिदी यांचे संघ एकमेकांना भिडले. सेहवाग आणि आफ्रिदी यांच्यामुळे या सामन्याला वेगळीच रंगत आली होती. सेहवागने या सामन्यात आपल्या लौकिकाला जागत स्फोटक फलंदाजी केली तरी त्याचा संघ आफ्रिदीच्या संघाकडून पराभूत झाला. 

सेहवागच्या पॅलेस डायमंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 9 बाद 164 धावा केल्या. यामध्ये सेहवागने 31 चेंडूत सर्वाधिक 62 धावा फटकावल्या. मात्र, आफ्रिदीच्या संघातील ओवेस शहाने सेहवागच्या तोडीस तोड फलंदाजी करत 74 धावा केल्याने आफ्रिदीच्या रॉयल संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकला. 

या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे एका गोठलेल्या तलावावर हा सामना खेळवण्यात आला. यावेळी येथील तापमान उणे पाच अंश इतके होते. दोन्ही संघांमध्ये माईक हसी, शोएब अख्तर, महेल जयवर्धने यांच्यासारख्या दिग्गज खेळाडुंचा सहभाग होता. एरवी हिरवळीवर खेळायची सवय असलेले हे खेळाडू या सामन्यात बर्फावरून अनेकदा घसरताना दिसले. त्यामुळे याठिकाणी क्षेत्ररक्षकांची चांगलीच कसोटी लागली. 

या सामन्यात सेहवागच्या पॅलेस डायमंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लाकूड आणि कृत्रिम गवताचे आवरण वापरून तयार करण्यात आलेल्या या खेळपट्टीवर तिलकरत्ने दिलशान (8), महेला जयवर्धने (7), मायकेल हसी (1) हे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. मात्र, त्यानंतर वीरेंद्र सेहवागने 31 चेंडूत 62 धावा चोपत आपल्या संघाला 164 धावांची मजल मारून दिली. सेहवागला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अँड्र्यू सायमंडने चांगली साथ दिली. त्याने 30 चेंडूत 40 धावा केल्या. आफ्रिदीच्या संघाकडून अब्दुल्ल रझ्झाकने सर्वाधिक चार विकेटस् घेतल्या.
हे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या रॉयल्स संघाची सुरूवातही खराब झाली. त्यांचे ग्रॅमी स्मिथ (23) आणि मॅट प्रायर (8) हे सलामीवीर झटपट बाद झाले. मात्र, त्यानंतर इंग्लंडच्या ओवेस शहाने जॅक कॅलिसच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला. ओवेस शहाने 74 तर कॅलिसने 36 धावा केल्या. कॅलिस बाद झाल्यानंतर आफ्रिदी फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याच्याकडून स्फोटक फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र, भारताच्या रमेश पोवारने  आफ्रिदीला लगेचच तंबूचा रस्ता दाखवला. मात्र, त्यानंतर शहा आणि इलिएट यांनी आणखी पडझड होऊन न देता संघाला विजय मिळवून दिला. Ice Cricket 2018 स्पर्धेतील दुसरा सामना शुक्रवारी होणार आहे. येथील सेंट मोर्टिझ रिसॉर्टजवळील गोठलेल्या तलावावर यापूर्वीही अनेक क्रिकेट सामने खेळवण्यात आले आहेत. मात्र, यंदा पहिल्यांदाच एखादी क्रिकेट मालिका खेळवण्यात आली आहे.
 

Web Title: Cricket match on Lake Liverpool in Switzerland; Sehwag got rid of Afridi's team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.