मुंबई : मुंबई पोलीस संघाने एव्हरग्रीन स्पोर्ट्स क्लब संघाविरुद्ध निर्णायक विजय मिळवत संतोष कुमार घोष ट्रॉफी या १६ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान मिळविला. डावखुरा फिरकी गोलंदाज झेनिथ सचदेव हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. सामन्यात ९ बळी मिळवत त्याने अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आतिफ खान (२६२ धावा आणि ९ बळी) याची तर सर्वोत्तम फलंदाज म्हणून सुमित मिश्रा (एव्हरग्रीन स्पोर्ट्स क्लब)- २८२ धावा आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून झेनिथ सचदेव (४ सामन्यात २६ बळी) यांना गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर तसेच मुंबईच्या रणजी संघाचे निवड समिती सदस्य संजय पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
कालच्या १ बाद १०४ धावांवरून पुढे खेळणारया मुंबई पोलीस संघाला आज कुश जैनच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने जबरदस्त हादरे दिले आणि सामन्यात चांगलीच रंगत निर्माण केली. त्याने ५९ धावांत ६ बळी मिळविले तर महम्मद जैन याने २२ धावांत ३ बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली आणि पोलीस संघाला ९ बाद १५९ धावांत रोखले. पोलीस संघाने मग त्याच धावांवर आपला डाव घोषित करून निर्णायक विजयाच्या दृष्टीने प्रयत्न केले. एव्हरग्रीन संघाला दुसऱ्या डावात १०५ धावांवर रोखल्याने त्यांना निर्णायक विजयासाठी केवळ ८९ धावांची गरज होती आणि हे लक्ष्य त्यांनी केवळ एक बळी गमावत १९.३ षटकातच पार करून घोष ट्रॉफीवर आपले नाव कोरले. हिरल पांचाळ याने ५९ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ५९ धावा करून संघाला विजयपथावर नेले.
संक्षिप्त धावफलक – एव्हरग्रीन स्पोर्ट्स क्लब- ६१.५ षटकात सर्वबाद १४२ (मित जैन ३६, यश सबनानी २९, विशाल प्रसाद २०; झेनिथ सचदेव ४४/५, आतिफ खान २४/३) ३१.४ षटकात ८ बाद १०५ डाव घोषित (कुश यादव ३५,झेनिथ सचदेव ३७/४, रेहान खान २३/२, अतिफ खान २०/२) पराभूत वि. मुंबई पोलीस जिमखाना – ५२.३ षटकात ९ बाद १५९ डाव घोषित (उत्सव कोटी ६६, आतिफ खान ३८,कुश यादव ५९/६, मोहम्मद जैन २२/३) आणि १९.३ षटकात १ बाद ९२ (उत्सव कोटी नाबाद २९, हिराल पांचाल नाबाद ५९)