मुंबई: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात विजयाने केली, मात्र टीम इंडियाला ती गती कायम राखता आली नाही. कसोटी मालिकेनंतर टीम इंडियाला वनडे मालिकेतही पराभवाला सामोरे जावे लागले. एकदिवसीय मालिकेचे नेतृत्व केएल राहुलच्या खांद्यावर आहे. राहुलने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून अनेक धडाकेबाज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण, आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रोहित शर्माचे पुनरागमन होणार असून तो परत येताच टीम इंडियात काही खेळाडूंचे स्थान निश्चित होऊ शकते.
या खेळाडूचे स्थान निश्चित होईल
पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने इशान किशनसारख्या तगड्या फलंदाजाला संधी दिली नाही. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाची मधली फळी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. इशान नेहमीच त्याच्या धडाकेबाज खेळीसाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वीही संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. हा खेळाडू रोहित शर्मासाठी नेहमीच खास मानला जातो. इशान किशन जेव्हा आपल्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजासमोर धावा काढू शकतो.
रोहित येताच मिळेल संधीइशान किशन आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सकडून खेळतो. अनेकवेळा पत्रकार परिषदेत रोहित शर्माने स्वतः सांगितले आहे की, किशनकडे खूप टॅलेंट आहे. इशान किशनने काही चेंडूतच सामन्याची दिशा बदलून टाकली आहे. त्याने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आहेत. इशानचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो कोणत्याही फलंदाजी क्रमाने फलंदाजी करू शकतो. त्याच्या टी-20 विश्वचषकात त्याचा समावेश करण्यात आला होता. इशान किशनने प्रत्येक मैदानावर तुफानी पद्धतीने धावा केल्या आहेत.
ऋषभ पंतमुळे जागा मिळत नाही
निवड समिती आणि कर्णधाराने ऋषभ पंतला भरपूर संधी दिल्या आहेत. पंतमुळे इशान किशनकडे दुर्लक्ष झाले आहे. इशान किशन 2016 च्या अंडर-19 संघाचा कर्णधार होता, तर पंत त्याच संघाचा उपकर्णधार होता. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही पंतपेक्षा चांगले आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये ईशानला मोठा पॉवर हिटर मानला जातो. क्रिझवर येताच तो आपल्या फलंदाजीने गोलंदाजांवर हल्ला चढवतो. त्याच्या या खेळीमुळेच त्याला आगामी सीरिजमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.