Cricket New Rules: क्रिकेट हा सज्जन लोकांचा खेळ (Gentlemen's Game) मानला जातो. क्रिकेट या खेळाची प्रतिमा त्याबाबत असलेल्या नियमांमुळे टिकून आहे. क्रिकेट हा खेळ योग्य पद्धतीने खेळला जायला हवा यासाठी वेळोवेळी या खेळातील नियमांमध्ये परिस्थितीनुसार बदल केले जातात. नुकतेच क्रिकेटमधील काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले. हे नवे नियम १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. मेलबर्न क्रिकेट क्लबने (MCC) मंगळवारी हे नियम जारी केले. यात सामन्यादरम्यान मैदानावरील 'घुसखोरी' याबाबतही नवा नियम करण्यात आला आहे.
क्रिकेटचा सामना सुरू असताना मैदानात कुत्रा किंवा एखादा प्राणी घुसल्याचं अनेक वेळा पाहायला मिळतं. परदेशातील अनेक क्रिकेट ग्राऊंड्स ही ओपन एअर आहेत. त्यामुळे एखादा प्राणी सहज पटकन मैदानात येतो आणि सामन्याचा वेळ वाया घालवतो. इतकेच नव्हे तर काही वेळा तर अचानक सामना सुरू असताना प्रेक्षकही थेट मैदानात येतात. एखाद्या खेळाडूचा फॅन म्हणून एखादा प्रेक्षक मैदानात घुसतो. इंग्लंड-भारत २०२१च्या कसोटी मालिकेत जारवो नावाचा माणूस सातत्याने मैदानात घुसताना दिसला. अशा घुसखोरीबद्दल नियमांत बदल करण्यात आला आहे.
आता मैदानावर सामन्यादरम्यान कोणताही प्रेक्षक किंवा प्राणी आल्यास त्यावेळी टाकण्यात आलेला चेंडू हा 'डेड बॉल' म्हणून घोषित केला जाईल. MCC चा कायदा 20.4.2.12 आता बदलण्यात आला असून त्यात हा बदल करण्यात आला आहे. तसेच खेळपट्टीवर आक्रमण करणारा माणूस, एखादा कुत्रा किंवा तत्सम प्राणी, किंवा कोणत्याही प्रकारचा बाहेरील हस्तक्षेप, ज्यामुळे खेळावर कोणत्याही प्रकारे परिणाम होत असल्यास तो चेंडू डेड बॉल घोषित केला जाईल.
नवे नियम हे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळी लागू झालेले असतील. यावेळी नव्या नियमांतर्गत स्पर्धा खेळली जाईल. चेंडूवर लाळ किंवा थुंकी लावून चेंडू चमकवण्यावरही कायमची बंदी घालण्यात आली आहे. तसेच, आता मंकडिंग करणं म्हणजेच गोलंदाजाने चेंडू टाकण्यापूर्वीच फलंदाजाला धावबाद करण्याचा पर्याय खुला करून दिला आहे आणि तसं झाल्यास ते क्रिकेटच्या खेळभावनेच्या विरुद्ध (Spirit of Cricket) मानला जाणार नाही. याशिवाय वाईड आणि डेड बॉलबाबतचेही काही नियम बदलण्यात आले आहेत.