Cricket News: 2022 साल भारतीय क्रिकेटसाठी फार चांगलं नव्हतं. संघाची कामगिरीही अपेक्षेप्रमाणे नव्हती. टी-20 विश्वचषकात इंग्लंडकडून 10 विकेटनी पराभव झाल्याने BCCI देखील खूप नाराज आहे. या टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता बोर्डाने मोठे बदल करण्याच्या तयारी केली आहे. आज, 1 जानेवारी रोजी बोर्डाची आढावा बैठक झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड, एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत बोर्डाची आढावा बैठक झाली. या बैठकीत टीम इंडियाच्या 2022 मधील कामगिरीवर चर्चा झाली. यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ज्याचा परिणाम टीम इंडियाच्या खेळाडूंवर होणार आहे.
या बैठकीनंतर समोर आलेल्या मुख्य गोष्टींमध्ये यो-यो (Yo-Yo Test ) टेस्ट आणि डेक्सा टेस्टचाही (DEXA Test) समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या निवडीसाठी बीसीसीआयने डेक्सा टेस्ट आणि यो-यो टेस्ट अनिवार्य केली आहे. बीसीसीआयच्या केंद्रीय करारातील खेळाडूंच्या सानुकूलित रोडमॅपच्या आधारावर (भूमिका आणि गरजेनुसार) याची अंमलबजावणी केली जाईल. यो-यो आणि डेक्सा टेस्ट म्हणजे काय ते जाणून घ्या.
यो-यो चाचणी म्हणजे काय?यो-यो चाचणीमध्ये एकूण 23 स्तर आहेत. क्रिकेटपटूंसाठी हे स्तर 5 व्या स्तरापासून सुरू होतात. यात 20 मीटर अंतरावर एक कोण(वस्तू) ठेवले जातात आणि प्रत्येक खेळाडूला कोणाला हात लावून परत यायचे असते. यासाठी एक वेळ निश्चित केलेली असते. जशी-जशी स्तरांची संख्या वाढते, हे अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळही कमी होतो. या आधारे गुण निश्चित केले जातात. बीसीसीआयने यो-यो चाचणी उत्तीर्ण होण्याचा स्कोअर 16.1 ठेवला आहे.
DEXA चाचणी म्हणजे काय?खेळाडूंची फिटनेस तपासणी थोडी अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी फिटनेस प्रोग्राममध्ये डेक्सा चाचणीचा समावेश करण्यात आला आहे. हाडांची घनता चाचणीला डेक्सा स्कॅन म्हणूनही ओळखली जाते. ही एक विशेष प्रकारची एक्स-रे चाचणी आहे, जी हाडांची घनता मोजते. यामुळे फ्रॅक्चरचीही अचूक माहिती मिळते. तसेच, या चाचणीद्वारे शरीरातील चरबीची टक्केवारी, मास आणि टिशू याबद्दल सर्व काही जाणून घेता येते. 10 मिनिटांच्या या चाचणीतून खेळाडू किती तंदुरुस्त आहे याचा अंदाज येतो. ही चाचणी एक्स-रेच्या मदतीने केली जाते.